Join us

ताऊते चक्रीवादळामुळे वीजयंत्रणेला धोका; हाय अलर्ट जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:06 AM

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आपत्कालीन आराखडालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना अरबी समुद्रातील ताऊते चक्रीवादळाचा ...

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आपत्कालीन आराखडा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना अरबी समुद्रातील ताऊते चक्रीवादळाचा मुसळधार पावसासह तडाखा बसणार आहे. या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आपत्कालीन आराखडा तयार करण्यात आला असून त्याप्रमाणे युद्धपातळीवर काम करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांतील वीजयंत्रणेला धोका निर्माण झाला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महावितरणने कर्मचाऱ्यांसाठी ‘हाय अलर्ट’ जारी केला असून सर्व अभियंता व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. यंत्रणा दुरुस्तीचे कामही युद्धपातळीवर करण्यात येणार आहे. कोविड रुग्णालये, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व रिफीलिंग उद्योग, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्रे, पाणीपुरवठा, मोबाईल टॉवर्स, रेल्वे व अत्यावश्यक सेवेसह घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

* अशी करणार व्यवस्था

स्थानिक प्रशासन व पोलीस विभागाशी समन्वय ठेवून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाणी साचेल किंवा वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल, तेथील वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात येणार आहे. नुकसान तसेच इतर आवश्यक माहिती मुख्यालयातील कक्षाला पाठविण्यात येईल. वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी इतर ठिकाणांहून अभियंते व कर्मचारी संबंधित दुरुस्ती कामासाठी पाठविण्यात येणार आहेत.

* पर्यायी व्यवस्थेतून करणार वीजपुरवठा सुरळीत

कमी नुकसान व्हावे यासाठी पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. आवश्यक यंत्रसामग्रीचा साठा करून ठेवण्यात येत आहे. यामध्ये विजेचे खांब, रोहित्र, वीजतारा, ऑईल व इतर तांत्रिक साहित्यांचा समावेश आहे. सर्व एजन्सीजना आवश्यक मनुष्यबळ, सामग्री व वाहनांसह तयार राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यास सर्वप्रथम प्राधान्याने पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.

- विजय सिंघल, अध्यक्ष, महावितरण.

------------------