Join us

शब्बे रातला वांद्रेत मृत्यूचा यू टर्न! चाळीस फुटी ब्रीजवरून कोसळून तरुणाचा मृत्यू

By गौरी टेंबकर | Published: March 10, 2023 1:48 PM

बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास मृत आहत खान हा त्याने नवीन खरेदी केलेल्या दुचाकीवर त्याच्या १७ वर्षीय मित्रासोबत फिरत होता.

मुंबई: भरधाव वेगात दुचाकी चालवून जीव धोक्यात घालू नये याबाबत वांद्रे पोलिसांकडून तरुणांमध्ये सतत जनजागृती करण्यात येत असते. मात्र त्याला डावलून ब्रीजवर वेगाने गाडी चालवणाऱ्या तरुणासाठी मृत्यूनेच जणू यू टर्न घेतला, ज्यात ४० फुटाच्या ब्रीज वरून कोसळून त्याचा मृत्यू झाला. 

पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास मृत आहत खान (१८) हा त्याने नवीन खरेदी केलेल्या दुचाकीवर त्याचा १७ वर्षांच्या मित्राला घेऊन फिरत होता. दोन्ही तरुण गोवंडीचे रहिवासी आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, "बुधवारी बडी रात असल्याने खान आणि त्याचा १७ वर्षीय मित्र बाईकवरून फिरत फिरत वांद्रे येथील यू-ब्रिजवर पोहोचले. तेव्हा खान हा भरधाव वेगाने दुचाकी चालवू लागला. दरम्यान त्याने यू-ब्रिजवर तीव्र यू टर्न घेतल्याने त्यांची दुचाकी सुरक्षा भिंतीच्या कोपऱ्यात आदळली आणि थेट ४० फूट उंची ब्रीजवरून ते खाली पडल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. यात खान गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा १७ वर्षीय मित्र गंभीर जखमी झाला असून त्याला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, खान हेल्मेटशिवाय दुचाकी चालवत होता. 

जीव धोक्यात टाकू नका !वांद्रे पोलिसांनी मृत खानवर रॅश ड्रायव्हिंगचा केल्या प्रकरणी एफआयआर नोंदवला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या वृत्ताला वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश धावरे यांनी दुजोरा दिला असून अशा प्रकारे निष्काळजीपणे गाड्या चालवत नागरिकांनी आपला जीव धोक्यात टाकू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

टॅग्स :अपघातमुंबई