मुंबई : लाँकडाऊनपूर्वी ७७ लाख रुपये किंमतीचा वन बीएचके फ्लॅट आता ६९ लाखांना आम्ही देतोय. आठवड्याभरात टोकन दिले तर त्यात आणखी सवलत मिळू शकेल … अवघे ११ हजार रुपये भरून घराची नोंदणी करा, दरमहा फक्त सहा हजार रुपये भरा आणि उर्वरित पैसे दोन वर्षानंतर घराचा ताबा घेताना द्या, ही आँफर फक्त लाँकडाऊन काळासाठीच आहे … ८६ लाखांचे घर ७४ लाखांना विकत घ्या आणि पुढली पाच वर्षे २६ हजार ९०० रुपयांचे मासिक भाडे हमखास मिळवा … कोरोनामुळे डबघाईला आलेल्या बांधकाम व्यवसायाल केवळ घरांची विक्रीच सावरू शकते हे पटल्यानंतर मुंबई ठाण्यातील विकासकांनी घराच्या किंमती कमी करून आकर्षक सवलतींचे मार्केटींग जोमाने सुरू केले आहे.
नोटबंदी, जीएसटी आणि रेरा कायद्यामुळे बांधकाम व्यवसायाचे आर्थिक गणित बिघडले होते. त्यानंतरही विकासक घरांच्या किंमती कमी करण्यास तयार नव्हते. मात्र, कोरोनाच्या प्रकोपामुळे हा व्यवसाय कोलमडून पडला आहे. मुंबई महानगर क्षेत्रातच बांधकाम पूर्ण झालेली एक लाखांपेक्षा जास्त घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. त्याशिवाय तेवढ्याच घरांचे बांधकाम येत्या दीड - दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. परंतु, आर्थिक मंदीमुळे या घरांची विक्री होणे अवघड असल्याची खात्री विकासकांना पटली आहे. त्यामुळे किंमती कमी करून घरांच्या विक्रीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी अनेक आकर्षक आँफर्स तयार झाल्या आहेत. डिजीटल मार्केटींग प्लॅटफाँर्मचा आधारही घेतला जातोय. चँनल पार्टनर आणि काँलसेंटर्सच्या माध्यमातून संभाव्य ग्राहकांना फोन आणि एसएमएसचा भडिमारही सुरू झाला आहे.
रिझर्व बँकेने रिव्हर्स रेपो दरात विक्रमी कपात केली आहे. त्यामुळे केवळ विकासकांनाच वित्तीय सहाय्य मिळणार नसून गृह कर्जसुध्दा स्वस्त होतील आणि सात टक्क्यांच्या आसपासच्या दरांनी ते मिळू शकेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. १५ वर्षांपूर्वी अशाच व्याज दरांमुळे गृह विक्रमी गृह खरेदी झाली होती. त्याची पुनरावृत्ती व्हावी अशी अनेक विकासकांची अपेक्षा आहे. कमी दरांतील गृह कर्जांचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास नरेडकोचे राष्ट्रीय अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांच्यासह महाराष्ट्राचे अध्यक्ष राजन बांदेलकर,अशोक मोहनानी, रोहित पोतदार अशा अनेक पदाधिका-यांनी व्यक्त केली आहे.
-----------------------
ग्राहकांचे वेट अँण्ट वाँच
विकासकांकडून अनेक आँफर्स दिल्या जात असल्या तरी सध्याच्या परिस्थितीत बहुतांश संभाव्य ग्राहकांनी वेट अँण्ट वाँचची भूमिका घेतली आहे. वेतन कपात आणि भविष्यातील आर्थिक संकटाचा पुरेसा अंदाज अनेकांना नाही. तसेच, घरांच्या किंमती भविष्यात आणखी कमी होतील अशी शक्यता आहे. त्यामुळे तूर्त खरेदी विक्री व्यवहारांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती शांती रिअलेटर्सच्या रुचीत झुनझुनवाला यांनी दिली.