उबाठाने दिले दिंडोशी आणि गोरेगाव मधील दहावीच्या हजारो विद्यार्थ्यांना सराव प्रश्नसंच
By मनोहर कुंभेजकर | Published: January 5, 2024 04:45 PM2024-01-05T16:45:01+5:302024-01-05T16:45:50+5:30
दहावीत शिकणाऱ्या गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना ‘मोठ्या’ क्लासेसच्या सराव प्रश्नपत्रिका विकत घेणे शक्य होत नाही.
मुंबई - दहावीच्या परीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना शिवसेना दिंडोशी विधानसभा क्षेत्रातर्फे विभागातील 16 शाळांमधील तब्बल तीन हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रश्नसंचाचे वाटप करण्यात येत आहे. तर गोरेगाव मधील दहा शाळांमधील पाचशे विद्यार्थ्यांना मोफत प्रश्न संचाचे वाटप करण्यात येत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना उपनेते भाऊ कोरगावकर, शिवसेना नेते व आमदार सुनिल प्रभु व युवासेना कार्यकारीणी सदस्य अंकित प्रभु उपस्थित होते.
दहावीत शिकणाऱ्या गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना ‘मोठ्या’ क्लासेसच्या सराव प्रश्नपत्रिका विकत घेणे शक्य होत नाही. त्यामुळे ही मुले गुणवत्ता असूनही बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क्स मिळवू शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व दिंडोशीचे आमदार सुनिल प्रभु आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू यांच्या संकल्पनेतून आणि विधानसभा संघटक प्रशांत कदम व माजी महापौर ॲड सुहास वाडकर यांच्या माध्यामतून उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला शाखा संघटक, उप शाखा प्रमुख, गट प्रमुख महिला पुरुष यांच्या वतीने विभागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना तज्ञांनी तयार केलेल्या गुणवत्तापूर्ण सराव प्रश्नपत्रिकांचे वाटप करण्यात येत आहे.
यामध्ये प्रत्येक विषयाच्या सात प्रश्नपत्रिका असलेले पुस्तकच विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, बीजगणित, भूमिती, विज्ञान आणि तंत्रज्ञान पेपर-1, विज्ञान आणि तंत्रज्ञान पेपर-2, इतिहास-राज्यशास्त्र, भूगोल-अर्थशास्त्र, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, इंग्लिश रीडर, हिंदी अशा विषयांच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिंडोशी विधानसभा क्षेत्रात विधानसभा संघटक रीना सुर्वे, पूजा चौहान, युवासेना विभाग अधिकारी प्रशांत मानकर व युवती विभाग अधिकारी श्रुतिका मस्तेकर, गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील ( पूर्व) भागात उप विभागप्रमुख सुधाकर देसाई, शाखाप्रमुख अजित भोगले यांच्या सहा पदाधिकारी यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी-कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.