दीप्ती देशमुख, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना आमदारांना अपात्र ठरविण्याची याचिका फेटाळण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने उबाठा गटाच्या १४ आमदारांना नोटीस बजावत ८ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल दिला आहे. शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाच्या आमदारांना नार्वेकर यांनी पात्र ठरवले. त्यामुळे ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. तर, शिंदे गटाने सुद्धा या प्रकरणी कोर्टात धाव घेतली. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांविरोधात मुंबई उच् न्यायालयात याचिका दाखल केली. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. मग शिंदे गटाकडून देण्यात आलेला व्हीप कसा लागू होत नाही? तो न मानणाऱ्या ठाकरे गटातील १४ आमदारांना अपात्र करा, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवर न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुनिवाला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती.
या याचिकेत गोगावले यांनी आदित्य ठाकरे व ऋतुजा लटके यांना वगळले आहे. न्यायालयाने उर्वरित सर्व आमदारांना नोटीस बजावत ८ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले.