Join us

उबर चालकाचे अभिनेत्री मनवा नाईकशी गैरवर्तन, अवघ्या काही तासांत ड्रायव्हरला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 06:29 IST

अवघ्या काही तासांत पोलिसांनी चालकाला ठोकल्या बेड्या

गाडी चालविताना मोबाईलवर बोलू नकोस, असे बजावल्यानंतर अभिनेत्री आणि दिग्दर्शक मनवा नाईक यांच्याशी गैरवर्तन करीत त्यांना धमकाविल्याप्रकरणी पोलिसांनीउबर चालकाला अँटॉप हिल परिसरातून रविवारी अटक केली. मोहम्मद मुराद अजमअली इद्रिसी (वय २१) असे या चालकाचे नाव आहे.

मनवा नाईक यांनी त्यांना आलेला अनुभव फेसबुकवर कथन केला. त्यानंतर पोलिसांच्या तपासाची चक्रे वेगाने फिरली. शनिवारी रात्री वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथून घरी जाण्यासाठी त्यांनी कॅब पकडली. त्या गाडीमध्ये बसताच चालक इद्रिसी याने फोनवर बोलण्यास सुरुवात केली. त्यावर मनवा यांनी आक्षेप घेतला. यादरम्यान चालकाने सिग्नलही तोडल्याने एका ट्रॅफिक पोलिसाने त्याची गाडी थांबवत फोटो काढला. तेव्हा आरोपीने वाहतूक पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. नाईक यांनी हस्तक्षेप करीत वाहतूक पोलिसांना गाडी पुढे जाऊ देण्याची विनंती केल्यावर दंडाचे ५०० रुपये तुम्ही भरणार का, असे इद्रिस याने विचारले. तसेच धमकावलेही.

नाईक यांनी कॅब पोलीस ठाण्याच्या दिशेने नेण्यास सांगितले, तेव्हा त्याने बीकेसीमधील एका अंधाऱ्या ठिकाणी गाडी थांबविली. पुढे त्याने चुनाभट्टी रोडच्या दिशेने प्रियदर्शनी पार्क दरम्यान जाणाऱ्या मार्गाने गाडी वेगात पळवायला सुरुवात केल्याने नाईक यांनी उबर सेफ्टीला फोन करीत घटनेची माहिती दिली. तेव्हा चालकाने गाडीचा वेग आणखीनच वाढविला. तसेच कोणाला तरी फोन करू लागला. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर बाइकस्वार आणि ऑटोरिक्षा चालकाने ही कॅब थांबवत नाईक यांची सुटका केली.पोलिसांकडून दखलमनवा नाईक यांनी हा अनुभव फेसबुकवर शेअर करताच सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांनी याप्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश दिले. परिमंडळ ८ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसानी उबर चालक इद्रिसला अँटॉप हिल परिसरातून ताब्यात घेतले.

टॅग्स :उबरपोलिसविश्वास नांगरे-पाटील