मुंबई - उबर चालकाने महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याची घटना मुंबईत घडली आहे. महिला प्रवासी अंधेरीला आपल्या घरी जात असताना चालकाने छेड काढत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी वांद्रे - वरळी सी लिंकवर ही घटना घडली आहे. महिला आपल्या चुलत भावाच्या घरी गेली होती. तेथून आपल्या घरी जाण्यासाठी उबर कार बूक केली होती. यावेळी प्रवासादरम्यान चालकाने महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने पोलिसांत तक्रार केली आहे. चालक सध्या फरार असून वांद्रे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिड-डेने दिलेल्या वृत्तानुसार, अंधेरीची रहिवासी असलेल्या महिलेने घरी जाण्यासाठी उबर बूक केली होती. यावेळी प्रवासादरम्यान चालकाने महिलेसोबत गप्पा मारण्यास सुरुवात केली. महिला गाडीत बसली तेव्हापासूनच त्याने खासगी प्रश्न विचारत मैत्री करण्याचा प्रयत्न सुरु केला.
तुम्ही मुंबईच्या आहेत का ? तुमचं कुटुंब मुंबईतच राहतं का ? असे प्रश्न चालक विचारत होता असा दावा महिलेने केला आहे. यानंतर त्याने नोकरीबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. मोबाइलची बॅटरी पुर्णपणे उतरली असल्याने महिला आपण व्यस्त आहोत असंही दाखवू शकत नव्हती. चालकाचं बोलणं ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने महिलादेखील उत्तर देत होती.
पुढच्या सीटवर येऊन बसा आणि माझ्या मोबाइलवरील व्हिडीओ पहा असं चालकाने सांगितलं होतं असंही महिलेने सांगितलं आहे. 'वांद्रे -वरळी सी लिंक क्रॉस केल्यानंतर काही वेळाने त्याने कार थांबवली आणि खाली उतरला. मागच्या सीटवर येऊन त्याने मोबाइलमधील काही व्हिडीओ मला दाखवण्याचा प्रयत्न केला. मी त्याला त्याच्या सीटवर जाऊन गाडी चालण्यासाठी बजावलं. पण त्याने माझ्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं. त्याने माझ्या हाताला स्पर्श केला आणि जवळ येण्याचा प्रयत्न करु लागला. मी कसंतरी दरवाजा उघडून तेथून पळ काढला', असं महिलेने सांगितलं आहे.
कारमधून बाहेर पडल्यानंतर महिलेने टोल नाक्याच्या दिशेने धाव घेतली. तेथील एका कर्मचा-याने महिलेची मदत करत दुसरी टॅक्सी मिळवून दिली. त्या टॅक्सीने महिला आपल्या घरी पोहोचली. महिलेने वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर चालक फरार झाला असून पोलीस तपास करत आहेत.