Join us

आरेतील नागरी समस्यांना केराची टोपली दाखवणाऱ्या प्रशासनाविरोधात “भिक मांगो आंदोलन”

By मनोहर कुंभेजकर | Published: January 03, 2024 4:41 PM

साई बांगोडा मरोळ मरोशी आदिवासी पाडे या मध्ये जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन जावे लागते.परिणामी आरेच्या नागरिकांना मानसिक शाररीक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागते. 

मुंबई-आरे युनिट ५ पंचवटी ते युनिट ६ ,युनिट ७, शिवाजी नगर, निंबारपाडा, देवीचा पाडा ,युनिट २९ ,युनिट ३०, मोराचा पाडा , मयूर नगर, रॉयल प्लाम, चरण देवपाडा,आदर्श नगर ,युनिट १६ ,युनिट १७ ,युनिट ३ ,युनिट २२ ,युनिट २५ ,युनिट ३१ ,युनिट ३२ ,केल्टी पाडा ,चाफ्याचा पाडा येथील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. तसेच साई बांगोडा मरोळ मरोशी आदिवासी पाडे या मध्ये जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन जावे लागते.परिणामी आरेच्या नागरिकांना मानसिक शाररीक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागते. 

येथील मुलांना, महिलांना, जेष्ठ नागरिकांना चाकरमानी व सर्व वाहनधारकांना होणार्‍या त्रासाच्या विरोधात लक्ष वेधण्यासाठी आणि न्याय हक्कासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी “भिक मांगो आंदोलन” दि:- १४ जानेवारी  रोजी  सकाळी ११ वाजता  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पंचवटी हॉटेलच्या बाजूला, युनिट ५ येथे आयोजित करण्यात आले आहे.या आंदोलनात  आरेच्या इमारतीमधील-सोसायटी-मंडळाच्या-चाळीतील नागरिक,महिला व चाकरमानी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती प्रभाग क्रमांक 52चे उबाठाचे स्थानिक शाखाप्रमुख संदीप गाढवे यांनी लोकमतला दिली.

आरे मधील अंतर्गत रस्ते दुरुस्त करा,आरे युनिट क्रमांक 16 मधील आरे हॉस्पिटल ठेकेदाराला न देता आपला दवाखाना म्हणून घोषित करा, आरे मधील नागरिकांना लाईट मीटर व घर दुरुस्तीला परवानगी द्या,आरेतील पडायला आलेली सरकारी निवासस्थाने व शौचालये तात्काळ दुरुस्त करा,आरेतील सर्व धार्मिक स्थळांना लाईट मीटर व दुरुस्तीसाठी परवानगी या विविध मागण्यांसाठी सदर आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित मंत्री या सर्व गोष्टी उघड्या डोळ्याने बघत असून  त्यावरती साधी दुरुस्ती सुद्धा करायला मागत नाही. संबंधित मुजोर अधिकारी आरेच्या नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी  केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या पर्यंत पोहचवतच नाही. त्यासाठी सदर आंदोलन हे केंद्र व राज्य सरकारच्या दप्तरी पोहोचवण्यासाठी  “भिक मांगो आंदोलन”आयोजित करण्यात आल्याची माहिती गाढवे यांनी दिली.

टॅग्स :मुंबईआरे