मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या ट्रॉफी चोरीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी स्पोर्ट्स पॅव्हेलियनला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या पॅव्हेलियनचा विकास होणे आवश्यक असून या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या खेळातील कौशल्याला चालना मिळू शकेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.ज्या ठिकाणी या ट्रॉफी ठेवण्यात आल्या होत्या. त्या रुमची दुरावस्था झाली आहे. पॅव्हेलियनमध्ये रूममध्ये प्र-कुलगुरूंच्या बंगल्यातील सामान आणि अन्य साहित्य अस्ताव्यस्त टाकल्याने त्याला गोडाऊनचे स्वरूप प्राप्त झाले होते. क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी शासन म्हणून आवश्यक असणारे सर्व ते सहकार्य विद्यापीठ प्रशासनाला केले जाईल तसेच लवकरच याबाबत बैठक घेऊन मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संदर्भातील सर्व प्रश्न तत्काळ सोडविले जातील, असे पॅव्हेलियनची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर उदय सामंत यांनी सांगितले. या विभागात अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक, पोलीस बंदोबस्त यासाठी पुन्हा पुढील आठवड्यात मंत्र्यांसोबत बैठक घेऊन याचा पाठपुरावा आपण करणार असल्याची माहिती युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली. यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि स्पोर्ट्स पॅव्हेलियन महत्त्वाच्या विभागाची सुरक्षितता राखली जाणार असल्याचे तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत यांनी यानिमित्ताने स्पष्ट केले.
सुरक्षेच्या अभावामुळे घटना घडली विद्यापीठात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नसलेली सोय, सुरक्षारक्षकांच्या संख्येचा अभाव, ढिसाळ नियोजन या कारणास्तव विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मेहनतीने कमावलेले चषक व पदके चोरीला गेली, त्यानंतर अधिकाऱ्यांनी मरिन लाईन्स पोलीस स्थानकात धावही घेतली. मात्र नेमके काय आणि किती पदके, चषक चोरीला गेले आहेत यांची एकूण माहिती नसल्याने तक्रार नोंदविण्यात आली नव्हती. मात्र आजच्या माहितीनुसार स्पोर्ट्स पॅव्हेलियन परिसरात चोरीच्या ठिकाणचे पंचनामे पोलिसांकडून झाले आहेत आणि आता पुढील कार्यवाही होईल.