-श्रीकांत जाधव
मुंबई : कोकणवासियांची प्रस्थापित नेत्यांनी घोर फसवणूक केली. त्यामुळे निसर्ग संपन्न कोकणाचा विनाश सुरू आहे. रोजगाराची स्वप्ने दाखवत तरुण बेरोजगारांची फौज निर्माण केली. गड किल्यांकडे दुर्लक्ष केले. मुंबई गोवा महामार्गात भ्रष्टाचार करून पैसे खल्ले या सर्व प्रकारला कोकणी माणूस कंटाळा आहे. त्याला पर्याय म्हणून कोकण प्रादेशिक पक्षाची शुक्रवारी मुंबईत घोषणा करण्यात आली. लोकसभेच्या १२ जागांसह उदय सामंत, रवींद्र चव्हाण, सुनील तटकरे विरुद्ध निवडणूक लढणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
कोकण प्रादेशिक पक्षाचे संयोजक ऍड.ओवैस पेचकर यांनी शुक्रवारी मुंबई प्रेस क्लब येथे नवीन कोकण प्रादेशिक पक्ष स्थापन झाल्याची घोषणा केली. ऍड. वैभव हळदे, शुभम उपाध्याय, नावीद मुल्ला हे पदाधिकारी उपस्थित होते. कोकणातील रिफायनरी विरोधात तसेच कोकणी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी प्रसंगी सत्ताधाऱ्यांना गाव बंदी करू असा इशारा यावेळी देण्यात आला.
कोकण प्रादेशिक पक्ष सात मुख्य उद्दिष्टे घेऊन काम करणार आहे. नवीन पक्षात विविध सेवा क्षेत्रातील उच्च शिक्षित तरुण, विधी तज्ञ, गावासाठी तळमळीने काम करणारे तरुण, चाकरमानी सदस्य आहेत. पक्षाची रितसर नोंदणी करण्यात आली असून सदस्य नोंदणी सुरू आहे. केवळ प्रादेशिक राजकारणाला महत्व देत कोकणाचा विकास साध्य करण्यासाठी निवडणुका लढविल्या जाणार आहेत. यामध्ये सत्ताधारी उदय सामंत, रवींद्र चव्हाण, सुनील तटकरे याच्या विरुद्ध उमेदवार दिले जाणार असल्याचे संयोजक ऍड. पेचकर यांनी सांगितले.
लालबागच्या शाखा प्रमुखांना संधी
मुंबईत लालबाग,परळ,भोईवाडा, शिवडी, खार, वाकोला, जोगेश्वरी, मालाड, कांदीवली, मुलुंड, विक्रोली, कांजूर अशा भागात मोठ्या संख्येने चाकरमानी राहत आहेत. त्यांना नवा पर्याय म्हणून कोकण प्रादेशिक पक्ष संधी देणार आहे. यामध्ये लालबाग शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख श्रीधर कदम यांना पक्षात महत्वाचे स्थान देण्यात येणार आहे.