Join us

उदयनराजे 'भाजपवापसी' करणार ? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर 'चर्चा तर होणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 7:57 AM

खासदार उदयनराजे भोसले यांनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना, जनता हाच माझा पक्ष आहे, जनता सांगेल तोवर मी निवडणूक लढवणार, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे उदयनराजे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण, यापूर्वीही भाजप सरकारमध्ये उदयनराजेंनी मंत्रीपद सांभाळले होते.  

खासदार उदयनराजे भोसले यांनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली. त्यामुळे उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी उदयनराजेंची असलेली मैत्री आणि राष्ट्रवादीकडून अद्याप लोकसभा उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची घोषणा न झाल्याने ते भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तर, उदयनराजेंनीही सूचक विधान करून सर्वांनाच बुचकळ्यात टाकले आहे. तसेच माझ्याविरुद्ध आवाज उठवणारे किती मताधिक्याने निवडून येऊ शकतात हे त्यांनी जाहीर करावे मीच त्यांचा प्रचार करेन, असेही त्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, यापूर्वीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात हजेरी लावली होती. तर, पवारांनी फसवाफसवी करु नये, असेही त्यांनी म्हटले होते. तसेच उदयनराजेंच्या उमेदवारीला साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांचा वाढता विरोध लक्षात घेता, उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी भाजप आघाडी सरकारमध्ये उदयनराजे महसूल राज्यमंत्री होते. गोपीनाथ मुंडेंनी त्यांना मंत्रीपदाची संधी दिली होती. त्यामुळे, आता पुन्हा भाजपवापसी करणार का ? या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणार आहे.  

टॅग्स :उदयनराजे भोसलेमंत्रालयदेवेंद्र फडणवीसपंकजा मुंडेलोकसभा