मुंबई - उदयनराजे भोसले यांच्या साताऱ्यातील कराड येथे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी सभा घेतली. आपल्या भाषणाची सुरुवातच जय भवानी-जय शिवाजी म्हणून केली. लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील उमेदवार उदयनराजे भोसले आणि विधानसभेचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारासाठी अमित शहा कराडमध्ये आले होते. त्यावेळी, उदयनराजेंनीही काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करत मोदी-शहांचे कौतुक केले. तसेच, कलम 370 हटविल्याचा उल्लेखही उदयनराजेंनी केला.
सातारा ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असून भगवा झेंडा दिल्लीपर्यंत पोहोचविण्याचं काम याच भूमितून झाल्याचं अमित शहांनी म्हटलं. शहांच्या भाषणापूर्वी उदयनराजेंनी मोदी आणि शहांचे अभिनंदन केले. जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 हटविल्याची धमक या सरकारने दाखविल्याचं उदयनराजे म्हणाले. तसेच भाजपा सरकारचे कौतुक करताना पवारांवर नाव न घेता टीकाही केली. 1996 मध्ये यांनी केवळ स्वार्थासाठी वाजपेयींचं सरकार पाडलं. त्यामुळे हजारो कोटींचं नुकसान देशाचं झाल. ते पैसे वाचले असते तर देशाच्या विकासासाठी वापरण्यात आले असते. आपल्या, साताऱ्यातील कृष्णामाईचा परिसरही विकसित झाला असता, असे उदयनराजेंनी म्हटलंय. उदयनराजेंनी नाव न घेता शरद पवार हेच वाजपेयींचं सरकार पाडण्यास कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, 1996 पासून आलेल्या तीनही सरकारांमध्ये कॉंग्रेसला सत्तेपासून बाहेरच रहावं लागलं होतं. मार्च 1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा सत्तेत आलेलं 'एनडीए'चं सरकार जयललितांनी पाठिंबा काढल्यानं एका मतानं पडलं आणि त्यानंतर कॉंग्रेसमधल्या नाट्याला सुरुवात झाली. या नाट्याच्या केंद्रस्थानी शरद पवार होते. वाजपेयी सरकार जाण्याच्या एक वर्ष अगोदर 1998 मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा बनलेल्या सोनिया गांधींनी सरकार स्थापनेचा दावा केला. पण, मुलायमसिंह यादवांनी सोनियांच्या विदेशी असण्याच्या मुद्दा पुढे करत काँग्रेसला पाठिंबा देण्याचं नाकारलं. पण, सोनियांना विरोध हा केवळ काँग्रेसबाहेरूनच होणार नव्हता.काँग्रेसमध्ये भूकंप होण्यासाठीही हाच मुद्दा कारणीभूत ठरणार होता. तो भूकंप शरद पवारांनी घडवून आणला. त्यांनी सोनियांच्या पंतप्रधान होण्याच्या शक्यतेला आक्षेप घेतला, स्पष्ट विरोध केला. पवार काँग्रेसमध्ये मुरलेलं नेतृत्व होतं. सहाजिक होतं की त्यांच्यासोबत त्यांनी अजून काही दिग्गजांची मोट बांधली होती.