मुंबई - संपूर्ण साताऱ्यात सर्वसामान्य कार्यकर्त्याला डावलणे आणि पाडापाडीचे राजकारण याला कंटाळलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच करेक्ट कार्यक्रम जिल्हा बँक निवडणुकीत करून दाखविला आहे. कोरेगावमध्ये सुनील खत्री हे जिल्हा बँकेत संचालक म्हणून निवडून गेले तर जावली मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या 1 मताने पराभव झाला आहे. शशिकांत शिंदे यांनीही या पराभवामागे मोठं राजकीय षड्यंत्र असल्याचं म्हटलं आहे. आता, शिवसेनेनंही शिंदेचा पराभव ठरवून केल्याचं म्हटलं आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून सहकारी बँकांच्या निवडणूक निकालावर भाष्य करण्यात आले आहे. त्यामध्ये, साताऱ्यातील निकाल धक्कादायक लागल्याचे सांगत, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा ठरवून पराभव करण्यात आल्याचे म्हटले आहे. सातारा बँकेत रामराजे निंबाळकर, उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, शेखर गोरे वगैरे प्रमुख लोक निवडून आले, पण शशिकांत शिंदे यांना ठरवून पाडले गेले. शिंदे यांचा विजय झाला असता तर जिल्हय़ातील सहकाराची सूत्रे त्यांच्या हाती गेली असती, असे सामनातून कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शिंदेंचा पराभव घडवून आणण्यात राष्ट्रवादीचेच लोक
सातारा, जळगाव, सांगली, धुळे, नंदुरबार, लातूर, रत्नागिरी या जिल्हय़ांतील सहकारी बँकांचे निवडणुकांचे निकाल लागले आहेत. शशिकांत शिंदे, शंभूराज देसाई, मंत्री के. सी. पाडवी यांना हादरे बसले आहेत. सहकार क्षेत्रात सत्तेमुळे भाजपला जी सूज आली होती ती पुरती उतरली आहे हे कालच्या निकालांनी दाखवून दिले, पण सातारा जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे हेवीवेट शशिकांत शिंदे फक्त एका मताने पराभूत झाले. त्यांच्याच पक्षाचे एक साधे कार्यकर्ते रांजणे यांनी शिंदे यांचा पराभव केला. त्यामुळे शिंदे यांनी राष्ट्रवादीच्याच कार्यालयावर हल्ला केला, दगडफेक केली. शिंदे यांचा पराभव घडवून आणण्यात राष्ट्रवादीचेच लोक सक्रिय होते, असा थेट आरोप शिवसेनेनं केला आहे.
शिंदेंना पराभूत करुन कोणी बाजी मारली?
शिंदे यांचा पराभव का झाला? कोणी केला? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, पण यानिमित्ताने जी छोटेखानी दंगल झाली ते चित्र बरे नाही. सातारा बँकेत रामराजे निंबाळकर, उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, शेखर गोरे वगैरे प्रमुख लोक निवडून आले, पण शशिकांत शिंदे यांना ठरवून पाडले गेले. शिंदे यांचा विजय झाला असता तर जिल्हय़ातील सहकाराची सूत्रे त्यांच्या हाती गेली असती. शिंदे हे शरद पवार यांचे कडवट अनुयायी आहेत. त्यामुळे त्यांना पराभूत करून कोणी बाजी मारली?, असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे. आमदार शशिकांत शिंदे यांना दुहेरी झटका..
जिल्हा बँकेच्या राजकारणात कायम किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या शशिकांत शिंदे यांना यंदा बँकेत प्रवेश करून द्यायचाच नाही, असा निर्धार नेतेमंडळींनी केला होता. त्याच हेतूने अनेक मंडळी गेल्या वर्षभरापासून कार्यरत होती. त्यांनी कोरेगाव आणि जावळी तालुक्यात अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यूहरचना केली होती. कोरेगाव तालुक्यातून आमदार शशिकांत शिंदे हे निवडणूक रिंगणात उतरले तर त्यांच्या विरोधात कोणीही उमेदवारी करायची आणि जावळीत त्यांच्या विरोधी कोणी उमेदवारी करायचे हे सर्व अगोदर ठरले होते. हे निवडणूक निकालानंतर टप्प्याटप्प्याने समोर येत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सुरू झालेल्या पराभवाची मालिका खंडित होण्याचे नाव घेत नाही. जिल्हा बँक निवडणुकीत जावळी आणि कोरेगावातील पराभव हा आमदार शशिकांत शिंदे यांना दुहेरी झटका मानला जात आहे.