Join us

मंत्र्यांच्या दौऱ्याची कल्पनाच देत नाहीत, उदयनराजेंनी व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 3:14 PM

जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींनी व जिल्हाधिकारी यांनी मंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात मला कळवायला हवं. माझ्या कार्यालयात मंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भातील पत्र यायला हवं होतं.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींनी व जिल्हाधिकारी यांनी मंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात मला कळवायला हवं.जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, कृषीमंत्री दादाजी भुसे नुकतेच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. मात्र, आम्हाला या दौऱ्यासंदर्भात कुणीही कळवले नाही

मुंबई - भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत कुठलिही कल्पना नसल्याचे म्हटले आहे. साताऱ्यात या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा झाला. मात्र, या दौऱ्याबद्दल आपल्याला कल्पनाच नव्हती, असे उदयनराजेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार सातारा दौऱ्यावर आले असता, आपण त्यांन का नाही भेटला? असा प्रश्न उदयनराजेंना विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना खासदारांनी ही प्रतिक्रिया दिली.  

जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींनी व जिल्हाधिकारी यांनी मंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात मला कळवायला हवं. माझ्या कार्यालयात मंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भातील पत्र यायला हवं होतं. मात्र, त्यांना वाटतं आम्हालाच दौरे पडतात, त्यामुळे आम्हाला कोणी दौऱ्याचं कळवतच नाही, असे म्हणत उदयनराजे भोसलेंनी नाराजी व्यक्त केली आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, कृषीमंत्री दादाजी भुसे नुकतेच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. मात्र, आम्हाला या दौऱ्यासंदर्भात कुणीही कळवले नाही, त्यामुळेच या मंत्र्यांना भेटता आले नाही, असे सांगत अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल पाळायला हवा, असेही उदयनराजेंनी म्हटले. 

कोरोनाबाबत बोलताना, आल्या परिस्थितीला न घाबरता सामोरं जाण्याचं आवाहन केलंय. कोरोनाचा विनाकारण बाऊ केला जातोय, स्वीडनमध्ये ज्याप्रकारे हर्ड इम्युनिटी पद्धतीचा वापर केला जात आहे. त्याचप्रमाणे भारतानेही वापर करावा, असे उदयनराजेंनी म्हटलं. तसेच, कोरोनाच्या संकटात कुणीही राजकारण करु नये, असा सल्लाही त्यांनी दिलाय. साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतल्यानंतर पत्रकाराशी बोलताना त्यांनी आपलं मत मांडलं. दरम्यान, सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा दीर्घ काळ प्रलंबित प्रश्न व अपुऱ्या प्रकल्पाची चर्चा तडीस नेण्याचा निर्णय साताऱ्यातील या बैठकीत अजित पवार यांनी घेतला आहे. 

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही उदयनराजेंनी आपलं मत दोन दिवसांपूर्वी व्यक्त केलं होतं. मला काही तज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तसं पाहिलं तर एकूण 3 ट्रिलियन्स व्हायरस आहेत, त्यामुळे कोरोना अनेकांना होऊनही गेला असेल, पण आपल्या रोगप्रतिकारशक्तीने त्यावर मात केली असेल. कोरोना हा वन ऑफ द व्हायरस इज, त्यामुळे एवढा बाऊ करायचा विषय नाही. दुर्दैवाने इतरही अनेक व्हायरसमुळे लोकांचे निधन झालेलं आहेच. लोकांनी या व्हायरसला घाबरुन न जाता वस्तुस्थितीला सामोरं गेलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, असे आवाहनही खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. तसेच, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील ऐकमेकांवर होणाऱ्या टीकांबद्दल बोलताना, ह्यांनी त्याच्यांवर केली अन् त्यांनी ह्यांच्यावर केली, मग त्यांना जाऊन विचारा. माझा काय संबंध त्यावर बोलायचा, असे म्हणत टीकात्मक राजकारणावर बोलण्यास उदयनराजेंनी नकार दिला.  

टॅग्स :उदयनराजे भोसलेसातारा परिसरअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस