मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्ली येथे जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची भेट घेतली. विशेष म्हणजे व्हॅलेंटाईन वीकमधील रोझ डे दिवशी उदयनराजेंनी पवारांना लाल गुलाबाचा बुके दिल्यानं चांगलीच चर्चा रंगली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने उदयनराजेंशी चर्चा केली. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये उदयनराजेंची भूमिका काय, याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत खासदार उदयनराजे भोसले यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. नुकतेच, उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन शरद पवारांची भेट घेतली आहे. तसेच प्रफुल्ल पवारांशीही आगामी निवडणुकांबाबत चर्चा केली. राज्यात उदयनराजेंना युवक वर्गाचा मिळणारा वाढता प्रतिसाद आणि त्यांची लोकप्रियता लक्षात घेता, त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशी सुत्रांची माहिती आहे. दरम्यान, साताऱ्यातून उदयनराजेंना विरोध असल्यामुळे त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार का नाही, याबाबत चर्चा होती. मात्र, पवार-भोसले भेटीनंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचं चर्चिलं जात आहे. तर, साताऱ्यातून उदयनराजेंची उमेदवारी निश्चित मानण्यात येत आहे. उदयनराजेंनी स्वत: ट्विट करुन शरद पवारांच्या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे.