'होऊन जाऊ दे चर्चा'; उद्धव ठाकरेंचं 'मिशन महाराष्ट्र', शिवसैनिकांना निरोप गेला!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 02:18 PM2023-07-11T14:18:07+5:302023-07-11T14:18:35+5:30
उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यानंतर पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यानंतर पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. "काल आणि परवा विदर्भाच्या कार्यकर्त्यांना भेटण्याचा कार्यक्रम होता. तिथे पोहरादेवीचे दर्शन घेतले. अमरावती आणि नागपुर येथे मेळावा झाला. माझ्या स्वागतासाठी खूप लोक थांबले होते, लोकांमध्ये उत्साह होता त्यांच्या मनात सरकारच्या कारभारावरून रागही आहे. फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यांनी सांगितले आहे काळजी करू नका आम्ही निवडणुकांची वाट पाहत आहोत", असे ठाकरेंनी म्हटले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
उद्धव ठाकरेंचं 'मिशन महाराष्ट्र'
तसेच महाराष्ट्रात आगामी काळात सभा घेणार असून जिथे जिथे जातोय तिथे छोट्या सभा होतच आहेत. सरकार दारोदारी जातंय पण दारातून परत येतंय. लोकांच्या घरामध्ये सर्व योजना पोहोचल्या का? लोकांना सुख शांती लाभली का? याची कोणीही विचारपूस करत नाही. त्यामुळे मी कार्यकर्त्यांना यामध्ये लक्ष घालण्यास सांगितले आहे. 'होऊन जाऊ दे चर्चा', हा कार्यक्रम कार्यकर्त्यांना ठरवून दिला असून ते घरोघरी योजना पोहोचल्या का याची पाहणी करतील.
ठाकरेंची भाजपावर टीका
एकिकडे उद्धव ठाकरेंच्या विधानामुळे सत्ताधारी भाजपा आक्रमक झाली आहे. उद्धव ठाकरें यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख 'नागपुरला लागलेला कलंक' असा करताच भाजपाने आक्रमक भूमिका घेतली. राज्यात विविध ठिकाणी सत्ताधारी भाजपाने ठाकरेंच्या विधानाच्या निषेधार्थ आंदोलने केली. भाजपा नेत्यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या विधानाचा निषेध केला. याबद्दल ठाकरेंना प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटले, "कलंक शब्दावरून एवढे आक्रमक होण्याचे कारण काय? कारण सत्ताधारी भाजपकडून सुरू असलेला कारभार हा महाराष्ट्रासाठी एक कलंकच आहे. तो लावणं त्यांनी थांबवावं. भाजपच्या सरकारनं लोकांच्या दारी जावं, पण घरातल्या लोकांचा तळतळाट घेऊन येऊ नये."