Join us

उद्धव यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

By admin | Published: March 18, 2017 4:25 AM

शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांसमवेत दिल्लीला गेलेले असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुंबईत भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

मुंबई : शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांसमवेत दिल्लीला गेलेले असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुंबईत भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान सभारंभासाठी राष्ट्रपती शुक्रवारी एक दिवसाच्या मुंबई दौ-यावर होते. हे निमित्त साधून उद्धव यांनी युवासेनेचे प्रमुख आदित्य समवेत राजभवनावर राष्ट्रपती मुखर्जी यांची भेट घेतली. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात येत असले तरी त्याबाबत विविध तर्क लावण्यात येत आहे. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेनेने विरोधकांच्या सूरात सूर मिसळला आहे. गेली सात दिवस विधिमंडळाचे कामकाज ठप्प आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून सरकावर टिकेची झोड उठवली जात आहे. असे असताना शुक्रवारी शिवसेना मंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्ली दौरा केला आणि केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेने प्रणव मुखर्जी यांना पसंती दिली होती. यंदा भाजपाचे पारडे जड आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या निकालानंतर भाजपाला आपल्या पसंतीची व्यक्ती या पदावर बसविणे शक्य होणार आहे. भाजपाकडून अद्याप कोणतेच नाव अद्याप निश्चित करण्यात आले नाही. ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण आडवाणींसह विविध नावे चर्चेत आहेत. राष्ट्रपती मुखर्जी यांनाच पुन्हा संधी देण्याबाबतचाही एक मतप्रवाह सुरु आहे. प्रणव मुखर्जींना पुन्हा संधी मिळणार असल्यास शिवसेनेची त्याला संमती असेल, अशी चर्चा आहे. (प्रतिनिधी)