उद्धव-डावखरे यांच्या कानगोष्टी

By admin | Published: April 16, 2016 01:08 AM2016-04-16T01:08:23+5:302016-04-16T01:08:23+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानिमित्त व्यासपीठावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या

Uddhav-Khavkhare's Kanggooshti | उद्धव-डावखरे यांच्या कानगोष्टी

उद्धव-डावखरे यांच्या कानगोष्टी

Next

बदलापूर/ठाणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानिमित्त व्यासपीठावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या सुरू असलेल्या कानगोष्टी सध्या चर्चेच्या ठरल्या आहेत. डावखरे यांची विधान परिषदेची मुदत संपली आहे आणि जूनमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी पुन्हा रिंगणात आहेत. शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी ते प्रयत्नशील असल्याने त्यादृष्टीने या कानगोष्टी महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. शिवसेनेने उमेदवार न देता बिनविरोध निवडासाठी पाठिंबा द्यावा, अशी डावखरे यांची इच्छा असल्याचे सांगितले जाते.
ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्थेतून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी डावखरे यांनी कंबर कसली आहे. त्यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे. राष्ट्रवादीसोबत अपक्ष, इतर छोटे पक्ष आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे किंगमेकर असलेले बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्यावर डावखरे यांची भिस्त आहे. मात्र सत्ताधारी पक्षांना न दुखावण्याची ठाकूर यांची राजकीय परंपरा पाहता त्यांच्या पाठिंबा याविषयी डावखरे साशंक असल्याचे मानले जाते. त्यामुळेच शिवसेनेने उमेदवार उभा न करता आपल्याला पाठिंबा द्यावा, यासाठी डावखरे यांचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या काळापासून शिवसेनेशी डावखरे यांचे संबंध सलोख्याचे राहिले आहेत. शिवाय विधान परिषदेतही त्यांनी त्या पक्षाला सांभाळून घेण्याची भूमिका वेळोवेळी पार पाडल्याने शिवसेनेचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास त्यांना वाटतो.
या निवडणुकीतील संख्याबळापेक्षा शिवसेनेसोबतची जवळीक त्यांच्या पथ्यावर पडण्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे ठाणे पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील इच्छुक, निष्ठावंतांना बाजुला सारुन डावखरे यांचा हट्ट मान्य करण्याचे धाडस शिवसेना दाखवेल का, हाही प्रश्न आहे.

शेवटची निवडणूक बिनविरोध व्हावी...
१९९२ पासून चारवेळा विधान परिषदेवर निवडून आलेल्या वसंत डावखरे यांनी यंदाची आपली विधान परिषदेची निवडणूक शेवटची असल्याची भावना काही नेत्यांजवळ खाजगीत व्यक्त केली आहे.
ती बिनविरोध व्हावी, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वच राजकीय पक्षांशी डावखरेंचे मित्रत्त्वाचे संबंध आहेत. ते फळाला यावेत यासाठी त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत.
त्यामुळे बदलापूरच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना डावखरे यांनी विजय निश्चित असल्यानेच मी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचा दावा केला. त्यामुळे त्यांची उद्धव ठाकरे यांच्या सोबतची चर्चा सफळ संपूर्ण झाल्याचे मानले जाते.

ठाकरेंनी दिला कानमंत्र
ठाकरे कार्यक्रमाला येण्यापूर्वीच डावखरे कार्यक्रमस्थळी हजर होते. तेथे पाचल्यावर जमलेल्या नगरसेवकांची भेट घेण्यास विसरले नाही.
शिवसेना आणि भाजपा नगरसेवकांना हात दाखवूनच ते व्यासपीठावर गेले. ठाकरे यांचे आगमन झाल्यावर प्रोटोकॉलनुसार त्यांना ठाकरे यांच्या शेजारचीच सीट मिळाली.
नंतर कार्यक्रम जोमात असताना डावखरे मात्र ठाकरे यांच्यासोबत चर्चेत व्यस्त होते. उभयतांची चर्चा सर्वांचेच लक्ष वेधत होते. बराच वेळ कानगोष्टी सुरु होत्या. शेवटी ठाकरे यांनी डावखरे यांना ‘कानमंत्र’ देऊन कार्यक्रमावर लक्ष केंद्रीत केले.

Web Title: Uddhav-Khavkhare's Kanggooshti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.