‘उद्धव सरकार, कमिशन सरकार’; पंतप्रधान माेदींनी चंद्रपूरातून फाेडला प्रचाराचा नारळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 12:06 PM2024-04-09T12:06:42+5:302024-04-09T12:07:34+5:30
पंतप्रधान माेदी यांनी चंद्रपूरमधून फाेडला महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळ
राजेश भाेजेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्रात भाजपने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार, बळीराजा जलसंजीवनी, मराठवाडा वाॅटर ग्रीड, मुंबई मेट्राे, काेकण रिफायनरी या अनेक याेजनांना महाविकास आघाडीच्या सरकारने केवळ कमिशनसाठी ‘ब्रेक’ लावला. ‘कमिशन लाओ, वरना ब्रेक लगाओ’ असे आघाडी सरकारमधील पक्षांचे धाेरण होते. ते आम्ही दुरुस्त केले, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्या नेतृत्वातील महाआघाडी सरकारवर केला.
चंद्रपूर व गडचिरोली-चिमूर मतदारसंघांसाठी लाेकसभा निवडणूक प्रचाराची राज्यातील पहिली सभा साेमवारी सायंकाळी चंद्रपुरात झाली. त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, चंद्रपूरचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार, गडचिराेली-चिमूरचे भाजप उमेदवार अशाेक नेते आदी उपस्थित हाेते. माेदी म्हणाले, ही निवडणूक स्थिर की अस्थिर सरकार यांच्यामधील लढाई आहे. स्थिर सरकार किती महत्त्वाचे असते हे महाराष्ट्राने अनुभवले आहे. आघाडी सरकारच्या काळात अशा अनेक याेजना कमिशनसाठी थांबवल्या गेल्या हाेत्या, त्या आता पुन्हा सुरू केल्या आहेत.
‘बांटाे और राज कराे’कडे इंडिया आघाडीची वाटचाल
भाजप आणि एनडीए देशासाठी माेठे व महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. दुसरीकडे काँग्रेस आणि त्यांच्या ‘इंडिया’ आघाडीचे ध्येय मात्र ‘सत्ता भोगा आणि मलई खा’, असे आहे. ‘बांटाे और राज कराे’ याच न्यायाने इंडिया आघाडीची वाटचाल सुरू असून, त्यांचे घाेषणापत्र हे मुस्लीम लीगची भाषा बाेलते, असा आराेप त्यांनी केला.
तब्बल दहा वर्षांनंतर पंतप्रधान
नरेंद्र माेदी यांची चंद्रपुरात सभा
महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात २०१४च्या निवडणूक प्रचारासाठी नरेंद्र मोदी पहिल्यांदा आले हाेते. आता दहा वर्षांनंतर ते पंतप्रधान पदावर असताना साेमवारी चंद्रपुरात आले. त्यामुळे त्यांना ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली हाेती. चंद्रपुरातील महाकाली मंदिर व चंद्रपूरकरांच्या स्नेहाचा माेदींनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला.
काँग्रेस कधीच
सुधारू शकत नाही...
काँग्रेसवाले कधीच सुधारणार नाहीत, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी प्रहार केला. देशाचे विभाजन, अशांत काश्मीर, बाॅम्बस्फोटांची मालिका, दहशतवाद्यांना संरक्षण, नक्षलवाद, ‘लाल आतंक’ला माेकळीक, राम मंदिराला विराेध, प्रभू रामांच्या अस्तित्वावरच न्यायालयात प्रश्नचिन्ह, राम मंदिर लाेकार्पणावर बहिष्कार, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्यास विलंब अशा सर्व गाेष्टींना काँग्रेसच जबाबदार असल्याचेही
ते म्हणाले.