Join us

मुलुंडकरांच्या पाण्यासाठी उद्धवसेना, भाजप मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 11:49 AM

उंच भागात राहणाऱ्यांना पाणी मिळत नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुलुंडकरांच्या पाण्यासाठी उद्धवसेना आणि भाजप मैदानात उतरले आहेत. मंगळवारी उद्धवसेनेचे खा. संजय पाटील यांनी पालिका उपायुक्तांची भेट घेतल्यानंतर भाजपचे पालिकेतील माजी गटनेते प्रभाकर शिंदे तसेच ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी विभाग कार्यालयावर धडक मारली.

मुंबईकरांना २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन फोल ठरले आहे. मुलुंड आणि वांद्रे भागात २४ तास पाणी पुरवठा करण्याचा प्रयोग फसला असून, धरणात मोठ्या प्रमाणात पाणीच नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुलुंड-घाटकोपर डोंगराळ भागात पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी महापालिका परिमंडळ सहाचे उपायुक्त संतोष कुमार धोंडे यांच्याशी वारंवार चर्चा करून सूचना केल्या आहेत, असे पाटील यांनी सांगितले.

मुंबईला २४ तास पाणी पुरवठा केल्यास मुंबईतील भांडुप, कांजूर, घाटकोपर यांसारख्या उंच भागात राहणाऱ्या नागरिकांना पाणी पुरवठा करणे शक्य नसल्याचे पालिकेचे अधिकारी सांगत आहेत. दमणगंगा, गारगाई व पिंजाळ यापैकी एकही नवीन पाणी प्रकल्प मार्गी लागलेला नाही. कधी नव्हे ते मुलुंड भागातही पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला असून, पालिका प्रशासन निष्क्रिय झाल्याची टीका पाटील यांनी केली. भाजपच्यावतीने बुधवारी 'टी' विभाग कार्यालयावर अपुऱ्या पाणी पुरवठ्यासंदर्भात धडक मोर्चा काढण्यात आला. माजी गटनेते प्रभाकर शिंदे, प्रकाश गंगाधरे नगरसेविका समिता कांबळे यांनी सहायक आयुक्त अजय पाटणे यांना निवेदन दिले.

उद्धवसेनेचे नेते आमदार अनिल परब यांनीही मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. एच पूर्व विभागातील अपुरा व कमी दाबाने होत असलेला दूषित पाणीपुरवठा, अनधिकृत बांधकामे आदी विषयांवर चर्चा केली.

 

टॅग्स :पाणीमुलुंडमुंबई