मुंबई :
राज्याच्या राजकारणासाठी यंदाची लोकसभा निवडणूक अत्यंत आव्हानात्मक आहे. फुटीच्या राजकारणानंतर पहिल्यादांच एकाच पक्षाचे दोन गट एकमेकांविरोधात लढतीसाठी सज्ज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, सोमवारी शहर निवडणूक कार्यालयात मुंबई दक्षिण, दक्षिण मध्य मतदारसंघातील तीन उमेदवार एकाच वेळेस उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी शिंदेसेना आणि उद्धवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यात आले असून पोलिस यंत्रणाही सज्ज आहे.
मुंबई शहर, उपनगरातील मतदारसंघांमध्ये मविआ-महायुतीत स्थानिक पातळीवर राजकारण तापलेले दिसून येते. या रॅलीच्या निमित्ताने पहिल्यांदाच मोठ्या संख्येने दोन्ही गटांतील नेत्यांसह कार्यकर्ते, पदाधिकारी समोरासमोर येणार असल्याने वादाची ठिणगी पडणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कुलाबा येथून निघणार रॅली मुंबई दक्षिण मतदारसंघाचे उद्धवसेनेचे अरविंद सावंत आणि मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातील उद्धवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांची रॅली कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यापासून सकाळी ११:३० वाजता सुरू होणार आहे. या उमेदवारांसाठी उद्धवसेनेचे युवासेना प्रमुख आमदारआदित्य ठाकरे उपस्थित असणार आहेत.
मुख्यमंत्री होणार सहभागी मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातील शिंदेसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील जीपीओ कार्यालयासमोरून सकाळी ११:३० वाजता रॅली निघणार आहे. या रॅलीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सहभागी होणार आहेत. शहीद भगतसिंग मार्गावरून दोन्ही दिशांनी या पक्षांच्या रॅली मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही उमेदवार आमने-सामने येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
३०० पोलिसांचा फौजफाटा सज्ज- पोलिसांनी पदयात्रेला परवानगी दिली आहे. यामध्ये १० पेक्षा जास्त वाहनांना प्रवेश नसणार आहे. - सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून या भागात ३०० पोलिसांचा फौजफाटा सज्ज करण्यात आला आहे. पोलिसांच्या दिमतीला एसआरपीएफ तसेच अन्य यंत्रणा आहेत. दोन्ही पदयात्रांचे मार्ग वेगळे ठेवण्यात आले आहेत. - १०० मीटरच्या अंतरावर सर्वांना थांबविण्यात येणार आहे. फक्त उमेदवारांच्या तीन वाहनांना आत प्रवेश असेल. निवडणूक कार्यालयात पाच जणांनाच सोडण्यात येईल. दोन्हीही पदयात्रा सामोरासमोर येऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे.