Join us

उद्धव सेनेच्या उपनेत्या संजना घाडी यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे सेनेत केला प्रवेश

By मनोहर कुंभेजकर | Updated: April 13, 2025 18:16 IST

महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव सेनेला बसला जोरदार धक्का

मुंबई-उद्धव सेनेच्या उपनेत्या संजय घाडी यांनी मागाठाणे विधानसभेतील अनेक उप शाखाप्रमुख, गट प्रमुख, शाखाध्यक्ष आणि युवा सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिंदे सेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या प्रवेशासाठी शिंदे सेनेच्या उपनेत्या व प्रकत्या शीतल म्हात्रे यांनी मेहनत घेऊन यशस्वी प्रयत्न केले. यावेळी विधान परिषद उपसभापती आणि शिंदे सेनेच्या नेत्या आमदार डॉ. निलम गोऱ्हे  उपस्थित होत्या.  

उद्धव सेनेच्या प्रवक्ते पदावरून त्यांना दूर केल्याने त्या पक्षावर नाराज झाल्या.त्यांच्या पक्ष प्रवेशाने महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव सेनेला जोरदार धक्का बसला असून लवकरच पश्चिम उपनगरातील उद्धव सेनेचे अनेक माजी नगरसेवक शिंदे सेनेत प्रवेश करतील अशी माहिती शीतल म्हात्रे यांनी दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मागील अडीच वर्षात सर्वसामान्यांना सोन्याचे दिवस आणण्याचे काम महायुती सरकारच्या माध्यमातून केले. एकीकडे विकास प्रकल्प आणि दुसरीकडे लोकाभिमुख योजना या दोघांची सांगड घालण्याचा प्रयत्न सरकारने केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या निवडणुकीत ८० जागा लढवून ६० जागा जिंकलो तर कोणी १०० जागा लढवून २० जागा जिंकल्या, यावरुन खरी शिवसेना कोणाची यावर जनतेने शिक्कामोर्तब केले. त्यांच्या आरोपाला आरोपातून नाही तर कामातून उत्तर दिले. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे  ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकाऱण या विचारानुसार आपले सरकार काम करतेय, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. संजना घाडी यांची शिवसेनेच्या उपनेते आणि प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची घोषणा त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, मुंबईत १५ ते २० वर्षांपूर्वी जी कामे व्हायला हवी होती ती आपण मागील अडीच वर्षात सुरु केली. मुंबईत अटल सेतु, कोस्टल रोड झाला. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केला. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची विमा सुरक्षा १.५ लाखांवरुन ५ लाख केली. हे काम करणारे सरकार आहे. ही काम करणारी शिवसेना आहे. धनुष्यबाण ही आपली निशाणी आहे. धनुष्यबाण आणि भगवा झेंडा हे आपले इमान आहे, श्वास आहे आणि आपला अभिमान आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाने प्रभावित होवून शिंदे सेनेत प्रवेश केला असे माजी नगरसेवक संजय घाडी यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :शिवसेना