विलेपार्ल्यात उद्धव सेनेला पडले खिंडार; जुईली शेंडे यांना दिले मनसेने तिकीट
By मनोहर कुंभेजकर | Published: October 28, 2024 03:00 PM2024-10-28T15:00:52+5:302024-10-28T15:01:27+5:30
काल रात्री त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची राजगडावर भेट घेतली आणि त्यांची पार्ल्यातून उमेदवारी जाहीर केली.
मनोहर कुंभेजकर, मुंबई-विलेपार्ल्यात उद्धव सेनेला खिंडार पडले आहे. विलेपार्ले मतदार संघात उद्धव सेनेतून इच्छुक असताना माजी नगरसेवक संदीप नाईक यांना पक्षाने उमेदवारी दिली.त्यामुळे नाराज असलेल्या उद्धव सेनेच्या विलेपार्ले विधानसभा समन्वयक जुईली शेंडे यांनी पक्षाला रामराम ठोकत मनसेत प्रवेश केला. त्यांनी २०१९ मध्ये विलेपार्ले विधानसभा मतदार संघातून मनसे तर्फे निवडणूक लढवली होती,त्यावेळी त्यांना १८६०० मते मिळाली होती.
काल रात्री त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची राजगडावर भेट घेतली आणि त्यांची पार्ल्यातून उमेदवारी जाहीर केली. राज ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.जोमाने लढा,जिंकण्यासाठी लढा असे सांगितले. यावेळी दोघांमध्ये सुमारे १५ मिनीटे चर्चा झाली.त्यांनी पून्हा एकदा विलेपार्ले विधानसभेचा उत्कर्ष करण्याची माझी जिद्द आणि तीव्र इच्छाशक्ती ओळखून, माझी क्षमता आणि सक्षमता ओळखून, माझ्यावर विश्वास दाखवून, विधानसभा निवडणूक लढण्याची संधी मला दिली,
याबाबत जुईली शेंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,विलेपार्ले विधानसभा मतदार संघ ही माझी कर्मभूमी आहे. मी सक्षम,सुशिक्षित उमेदवार असतांना मला डावलले.विशेष म्हणजे फेब्रुवारी २०२१ मध्ये पक्षात प्रवेश केला.संघटना वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतली,आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला.
मी इच्छुक असतांना मला तिकीट तर दिले नाही.मात्र पुढे पक्ष निश्चित विचार करेल असे साधे वरिष्ठ नेत्यांनी सांगण्याचे धारिष्ट देखिल दाखवले नाही.त्याचे खूप वाईट वाटले.लेक लाडकी म्हणायचे आणि तिलाच राजकारणात पुढे येवू द्यायचे नाही,हे माझ्या बाबतीत घडले याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत मला विश्वासात घेतले गेले नाही. एकंदरीतच अनुभवाने हे सिद्ध झाले की,उद्धव सेनेत सक्षम, सुसंस्कृत आणि सुशिक्षित महिलांची संघटनेला कदरही नाही आणि गरजही नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पार्ल्यात होणार चौरंगी लढत
भाजपाने विद्यमान आमदार अँड.पराग अळवणी यांना तिकीट दिले आहे.तर उद्धव सेनेने माजी नगरसेवक संदीप नाईक यांना तिकीट दिले आहे.मनसेच्या जुईली शेंडे या देखिल आता निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.तर येथून इच्छुक असूनही तिकीट मिळाले नसल्याने माजी आरोग्य मंत्री व शिंदे सेनेचे उपनेते डॉ.दीपक सावंत यांनी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला असून ते उद्या आपला निवडणूक अर्ज भरणार आहे.त्यामुळे विलेपार्लेत चौरंगी लढत अपेक्षित आहे.