मुंबई महानगरपालिकेची आर उत्तर विभागाची दहिसर जकात नाक्याची जागा धारावी पुनर्वसन प्राधिकरणाला देण्यास उद्धव सेनेचा विरोध
By मनोहर कुंभेजकर | Published: July 18, 2024 05:52 PM2024-07-18T17:52:25+5:302024-07-18T17:53:36+5:30
ही जागा धारावी पुनर्वसन प्राधिकरणास देण्यास उद्धव सेनेने आणि दहिसर येथील स्थानिक रहिवाश्यांनी प्रचंड विरोध दर्शवला आहे.
मनोहर कुंभेजकर, मुंबई-दहिसर चेक नाका येथे जकात नाका बंद झाला आहे. या परिसरातील मुंबई महानगरपालिकेची 6 एकर जागा मोकळी असून, ही जागा, झोपडपट्टी पुनर्विकास (झोपु) प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी धारावी प्रकल्पासाठी संपादन करण्याची मागणी केली असल्याची चर्चा आहे. ही जागा धारावी पुनर्वसन प्राधिकरणास देण्यास उद्धव सेनेने आणि दहिसर येथील स्थानिक रहिवाश्यांनी प्रचंड विरोध दर्शवला आहे.
शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार डॉ. विनोद घोसाळकर म्हणाले की, आर उत्तर विभागातील डी पी प्लॅनमध्ये अजूनही येथील लोकसंख्येच्या मानाने पायाभूत सुविधांचा विकास झालेला नाही. त्यात जर धारावी पुनर्वसन प्राधिकरणाला ही जागा देण्यात आली तर येथील परिस्थिती अजून बिकट होईल. दहिसर येथील नागरिकांच्या मनात देखील या प्रकल्पाबाबत तीव्र नाराजी आहे. त्यामुळे उद्धव सेनेचा धारावी पुनर्वसन प्रकल्पाला स्पष्ट विरोध आहे. या बाबत भाजपाचे स्थानिक खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी आमची मागणी आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांना दिलेल्या पत्रात उद्धव सेनेची आणि स्थानिकांची भूमिका मांडली असल्याचे त्यांनी सांगितले.
दहिसर चेक नाक्यावरील पश्चिम द्रुत मार्गावरून ठाणे, पालघर, डहाणू व गुजरात राज्यातून नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. हा मार्ग वाहतुकीचा प्रमुख मार्ग असून त्यामुळे चेकनाक्यावर नेहमी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. गुजरात राज्यातील नागरीक प्रवासासाठी प्रवासी बसेसचा मोठ्या प्रमाणात उपयोग करत असतात. मालवाहतूक ट्रक देखील याच मार्गाने येत असतात. तसेच याच मार्गावरून ठाणे जिल्ह्यातून अनेक रुग्ण हे मुंबईत उपचारासाठी येत असतात. पण येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे दक्षिण मुंबईतील रुग्णालयांत पोहचायला त्यांना नेहमी तीन तास वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी के. ई. एम रुग्णालयाच्या धर्तीवर येथे सुसज्ज अद्ययावत रुग्णालय उभारण्याची मागणी मुंबई महानगरपालिकेकडे केली आहे. बाहेरून येणाऱ्या बस, ट्रक, चारचाकी वाहने यांच्यासाठी अद्ययावत पार्किंग टर्मिनल व्हावे, अशी सुद्धा मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. अशा परिस्थितीत जर येथे धारावी पुनर्वसन प्रकल्पाला जागा दिली तर परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिघडेल असा इशारा त्यांनी दिला.