Join us

मराठी माणसाला नोकरी नाकारणाऱ्या कंपनीला उद्धव सेनेचा दणका; मागितला माफीनामा

By मनोहर कुंभेजकर | Published: July 25, 2024 6:40 PM

याद राखा मराठी माणसाला डावलण्याचा प्रयत्न कराल तर गाठ आमच्याशी आहे, असा ठोस इशारा दिला.

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र व  मुंबईत मराठी माणसाला नोकरी देण्यात यावी, यासाठी लढा दिला होता. मात्र अंधेरी (पूर्व ) मरोळ नाका येथील मकवाना रोडवरील आर्या गोल्ड कंपनीच्या व्यवस्थापनाने मराठी व्यक्ती नोकरीसाठी नको, अशी जाहीरात दिली. हा मराठी माणसाचा अपमान असून तो कदापी सहन केला जाणार नाही, असा इशारा देत आज दुपारी या कंपनीवर उद्धव सेनेचे अंधेरी विधानसभा संघटक प्रमोद सावंत आणि शिवसैनिकांनी धडक देत या कंपनीच्या मालकाला जाब  विचारला. 

याद राखा मराठी माणसाला डावलण्याचा प्रयत्न कराल तर गाठ आमच्याशी आहे, असा ठोस इशारा दिला. यावेळी शाखाप्रमुख राजू माने, शाखाप्रमुख बिपिन शिंदे,उपशाखाप्रमुख भगवान तिर्लोटकर व समस्त शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. याबाबत प्रमोद सावंत यांनी सांगितले की, सदर व्यवस्थापनाने दिलेल्या नोकरीविषयक जाहिरातीत मराठी उमेदवार नाकारला आहे. महाराष्ट्र व मुंबईतील मराठी माणसाबद्धल दुजाभाव केला आहे, याचा जाहिर निषेध करत असून आपल्या आस्थापनात संपूर्ण मराठी उमेदवारांची भरती झाली पाहिजे. आपली जाहिरात मागे घ्यावी अन्यथा पुढील संघर्षाला तयार राहा असा त्यांना सज्जड इशारा दिल्याचे त्यांनी सांगितले.

कंपनीचा माफीनामाबंटी रुपरेना यांनी आर्या गोल्ड कंपनीचा मालक या नात्याने सर्व महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली. नोकरी पोर्टलवर ऑनलाईन जाहिरात देताना नवीन मुलीच्या हातून चुकून झालेल्या अपडेट जाहिरातीत लगेच सुधारणा करून पूर्वीची चुकीची जाहिरात हटवली. यामध्ये आमच्या कंपनीचा महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता. झालेल्या चुकीबद्धल मी कंपनीचा मालक म्हणून माफी मागतो, असे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :मुंबई