दहिसर-बोरिवली विधानसभा मतदारसंघात उद्धव सेनेला खिंडार, महिला विभागसंघटकासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे सेनेत प्रवेश
By मनोहर कुंभेजकर | Updated: January 31, 2025 15:56 IST2025-01-31T15:56:35+5:302025-01-31T15:56:58+5:30
आगामी पालिका निवडणुकीत विभाग क्रमांक १ मध्ये झालेल्या या पक्ष प्रवेशामुळे शिंदे सेनेला चांगले यश मिळेल अशी चर्चा येथे सुरू झाली आहे.

दहिसर-बोरिवली विधानसभा मतदारसंघात उद्धव सेनेला खिंडार, महिला विभागसंघटकासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे सेनेत प्रवेश
मनोहर कुंभेजकर -
मुंबई-पश्चिम उपनगरात शिंदे सेनेत सध्या जोरदार इन्कमिंग सुरू आहे.उद्धव सेनेच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनेत्या राजुल पटेल यांनी नुकताच शिंदे सेनेत प्रवेश केला होता. तर आता विभाग क्रमांक १ मधील दहिसर, बोरिवलीत उद्धव सेनेला मोठे खिंडार पडले आहे.आगामी पालिका निवडणुकीत विभाग क्रमांक १ मध्ये झालेल्या या पक्ष प्रवेशामुळे शिंदे सेनेला चांगले यश मिळेल अशी चर्चा येथे सुरू झाली आहे.
शिंदे सेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तगिरी बंगल्यावर त्यांच्या उपस्थितीत काल रात्री आठच्या सुमारास झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात उद्धव सेनेच्या विभाग क्रमांक १ च्या महिला विभागसंघटक सुजाता शिंगाडे यांच्या सह दहिसर विधानसभेतील विधानसभा संघटक अविनाश लाड,विधानसभा संघटक व प्रभाग क्रमांक ७चे माजी शाखाप्रमुख संदिप राऊत, शाखा क्रमांक २ चे शाखाप्रमुख सुधाकर राणे,उपशाखाप्रमुख विनोद वारे, बोरिवली येथील शाखा क्रमांक १८ च्या महिला शाखा संघटक श्रुती परब,शाखा समन्वयक तृप्ती पांचाळ आणि दहिसर-बोरिवली येथील अनेक पुरुष-महिला उपशाखाप्रमुख, गटप्रमुख यांनी शिंदेंसेनेत प्रवेश केला.शिंदे सेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी या प्रवेशा संदर्भात महत्वाची भूमिका बजावली असल्याची माहिती सूत्रांनी लोकमतला दिली.
तसेच यावेळी अंधेरी येथील वाल्मिकी समाजाचे नेते सुनिल तुषामड आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन मागील महिनाभरात विविध पक्षांच्या हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की,हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी उठाव केला होता. त्याची प्रचिती मागील अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामातून दिसली. त्यामुळेच अनेक पक्षातील लोकप्रतिनिधी शिंदेंसेनेत येत आहेत,
विधानसभा निवडणुकीत शिंदे सेना ८० जागा लढली आणि ६० आमदार निवडून आल्या. तर उद्धव सेना ९५ जागा लढले आणि २० जागी निवडून आले. उद्धव सेनेपेक्षा शिंदे सेनेला १७ लाख अधिक मते मिळाली तर लोकसभेत दोन लाख जास्त मते मिळाली. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न उरलेला नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे,उपनेत्या शीतल म्हात्रे, मीना कांबळी,माजी नगरसेवक राम रेपाळे, उपनेत्या तृष्णा विश्वासराव, सुवर्णा करंजे, राजुल पटेल , माजी नगरसेवक अमेय घोले तसेच शिंदे सेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.