Join us

आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव सेना देणार नवीन चेहऱ्यांना संधी

By मनोहर कुंभेजकर | Published: July 19, 2024 7:46 PM

वरुण सरदेसाई, डॉ.विनोद घोसाळकर,अमोल कीर्तिकर यांची नावे चर्चेत

मनोहर कुंभेजकर, मुंबई- येत्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता असून, या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी व महायुतीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महाविकास आघा़डीत मुंबईत ठाकरे गटाच वर्चस्व असून, मुंबईतील ३६ पैकी किमान २५ जागा मिळण्यासाठी उद्धवसेना आग्रही असल्याचे समजते.

लोकसभेत उद्धव सेनेला मोठं यश मिळवल्यानंतर आता उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकींसाठी कंबर कसली आहे. लोकसभेला मुंबईत उद्धवसेनेला तीन जागा मिळाल्या, त्यामुळे ठाकरेंची नजर प्रामुख्यानं मुंबईवर आहे. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी उद्धव सेना मुंबईतील ३६ पैकी किमान २५ जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बीकेसी येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये गेल्या मंगळवारी उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू आणि माजी खासदार राजन विचारे यांच्यासोबत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत मुंबईतील विधानसभा मतदारसंघनिहाय रणनीती ठरवण्यावर चर्चा झाली.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १४ जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या. शिवसेनेत फूट पडल्यावर त्यातील आठ आमदार उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत, तर मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे,माहीमचे आमदार सदा सरवणकर,भायखळाच्या आमदार यामिनी जाधव,चांदीवलीचे आमदार दिलीप लांडे व कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर हे ५ आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदें सोबत आहेत. शिंदे सेनेचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून ४८ मतांनी खासदार म्हणून निवडून आल्यावर रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

उद्धव सेनेतून अनेक नव्या चेह-यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे संधी देणार असून, आमदार आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई, जोगेश्वरी पूर्व मधून उद्धव सेनेचे उपनेते अमोल कीर्तिकर, तर दहिसर मधून माजी आमदार डॉ.विनोद घोसाळकर यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मविआत निवडणूक लढवताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेससोबत काही जागांमध्ये अदलाबदल केली जाणार शक्यता असून मविआच्या बैठकांमध्ये या संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.

मुंबईतील त्या कोणत्या २५  जागांवर उद्धव सेना आहे इच्छुक 

उद्धव सेना शिवडी, वडाळा,भायखळा,शिवडी, भायखळा, वरळी, माहीम,कुर्ला, चेंबूर,भांडुप पश्चिम, विक्रोळी, मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा,  विलेपार्ले, वांद्रे पूर्व, कलिना,कुलाबा,चांदिवली, बोरिवली, मलबार हिल, अणुशक्ती नगर आणि मानखुर्द शिवाजीनगर या मुंबईतील एकूण २५ जागांसाठी आग्रही आहे. मात्र यावर मवीआच्या बैठकीत अंतिम  निर्णय घेतला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

हे आहेत उद्धव सेनेचे विद्यमान आमदार

उद्धव सेनेचे आदित्य ठाकरे-वरळी, सुनील प्रभू -दिंडोशी, ऋतुजा लटके-अंधेरी पूर्व,संजय पोतनीस-कलिना,आमदार सुनील राऊत-विक्रोळी,आमदार रमेश कोरगावकर-भांडुप,प्रकाश फातर्फेकर-चेंबूर, अजय चौधरी-शिवडी या आठ विद्यमान आमदारांना उद्धव ठाकरे परत निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असून यातील एक-दोन जागांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची देखिल चर्चा आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनामुंबई