उद्धवसेनेच्या डिजिटल शाखेचा ‘सोशल वॉच’; फेक नरेटिव्ह रोखण्यासाठी शाखानिहाय समन्वयक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 08:47 IST2025-02-22T08:47:04+5:302025-02-22T08:47:51+5:30

विरोधकांच्या सोशल मीडियावर ही शाखा नजर ठेवणार असून शाखानिहाय समन्वयक नेमले जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.

Uddhav Sena's digital wing's 'Social Watch'; Branch-wise coordinator to prevent fake narratives | उद्धवसेनेच्या डिजिटल शाखेचा ‘सोशल वॉच’; फेक नरेटिव्ह रोखण्यासाठी शाखानिहाय समन्वयक

उद्धवसेनेच्या डिजिटल शाखेचा ‘सोशल वॉच’; फेक नरेटिव्ह रोखण्यासाठी शाखानिहाय समन्वयक

महेश पवार

मुंबई : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आ. आदित्य ठाकरे आणि उद्धवसेनेच्या नेत्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांकडून विरोधक फेक नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या फेक नेरेटिव्हला उत्तर देण्यासाठी युवासेनेची डिजिटल शाखा पुढे सरसावली आहे. विरोधकांच्या सोशल मीडियावर ही शाखा नजर ठेवणार असून शाखानिहाय समन्वयक नेमले जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधारी अशा दोन्हींकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर टीका केली जात आहे. या टीकेला उत्तर देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे कार्यकर्ते सोशल मीडिया समन्वयक म्हणून काम बघणार आहेत.

राज्य स्तरावर ३४ तर मुंबईसाठी १७ समन्वयक नेमले आहेत. तर, जिल्हा, तालुका आणि वॉर्ड पातळीवरील समन्वयकांच्या नियुक्त्या मार्च महिन्यात करण्यात येतील, असे या सूत्रांनी सांगितले. उद्धवसेनेचे मुख्य काम हे शाखेच्या माध्यमातून होत असल्यामुळे प्रत्येक शाखेचे सोशल मीडियावर पेज तयार करण्यात येणार आहे.

त्या पेजच्या माध्यमातून उद्धवसेनेचे संदेश प्रसारित करणे, फेक नरेटिव्हला उत्तर देणे, शाखेच्या माध्यमातून नागरिकांचे सोडविले प्रश्न, आमदार, खासदार निधीतून झालेल्या कामांची प्रसिद्धी करण्यात येणार आहे. सोशल मीडियाची जाण असणाऱ्या युवक, युवतींवर शाखा समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात येणार असून त्यांना विशेष प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

सोशल मीडिया, यूट्यूब, व्हॉट्सअप अशा माध्यमांद्वारे पक्षाचे विचार आणि काम स्थानिक जनतेपर्यंत पोहोचविणे हा हेतू आहे. सत्ताधारी पक्षाकडून उद्धवसेनेविरोधात फेक नरेटिव्ह तयार केले जात आहे. त्याची तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे आमची सोशल मीडिया टीम त्यांच्या टीकेला, फेक नरेटिव्हला उत्तर देण्याचे काम करणार आहे.

अयोध्या पौळ पाटील, सोशल मीडिया राज्य समन्वयक, उद्धवसेना

Web Title: Uddhav Sena's digital wing's 'Social Watch'; Branch-wise coordinator to prevent fake narratives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.