बाळासाहेबांनी हिंदूंना एकत्र केलं, आज हिंदुत्वात राजकीय स्वार्थाची भेसळ; उद्धव यांचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 07:38 AM2018-01-23T07:38:10+5:302018-01-23T11:17:06+5:30

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Uddhav Thackarey on Shivsena Pramukh Balasaheb Thackeray Jayanti | बाळासाहेबांनी हिंदूंना एकत्र केलं, आज हिंदुत्वात राजकीय स्वार्थाची भेसळ; उद्धव यांचा भाजपाला टोला

बाळासाहेबांनी हिंदूंना एकत्र केलं, आज हिंदुत्वात राजकीय स्वार्थाची भेसळ; उद्धव यांचा भाजपाला टोला

Next

मुंबई - शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आताच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले आहे. ''जाती गाडून हिंदू म्हणून एकत्र करण्याचा राजकीय चमत्कार बाळासाहेबांनी केला. ते हिंदुहृदयसम्राट झाले ते लोकांच्या आशीर्वादाने. बाळासाहेबांच्याच हिंदुत्वाच्या पुण्याईचे फळ आजचे राज्यकर्ते चाखत आहेत. आज हिंदुस्थान संकटात आहे व हिंदुत्वात राजकीय स्वार्थाची भेसळ सुरू आहे. आज बाळासाहेबांचा जन्मदिवस. त्यांचे स्मरण सदैव होतच राहील. बाळासाहेब हे गरुडझेप घेणारे होते. बाकी सगळे पुंग्या वाजवणारे ‘गारुडी’ बनले आहेत. बाळासाहेब अमर आहेत! त्यांनी पेटविलेला यज्ञकुंडही अखंड धगधगत आहे.'', असे उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये म्हटले आहे. 
 
- काय आहे आजचे सामना संपादकीय?
देशाचे राजकारण हे गजकर्णाच्या खालच्या पातळीवर पोहोचले आहे व महाराष्ट्र हे राष्ट्रीय राजकारणातून बाद झाले आहे अशा विचित्र अवस्थेत शिवरायांचा महाराष्ट्र सापडला आहे. तोंडाची डबडी वाजवून आरोप-प्रत्यारोपांचा गोंधळ घालणे यालाच काही जण राजकारणाचा मुलामा देत असतील तर त्यांनी शिवसेनाप्रमुखांचे राजकारण व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केला पाहिजे. राजकारण हा शिवसेनाप्रमुखांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक मुख्य पैलू, पण बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या राजकारणापेक्षा अनेक पटींनी भव्य होते. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी शिवसेनेचा यज्ञकुंड नुसता चेतवला नाही, तर पंचेचाळीस वर्षे पेटताच ठेवला. आजही तो धगधगता आहे. त्याचे श्रेय शिवसेनाप्रमुखांनाच आहे. त्यांनी ना शिवसेनेत जातीपातीचा विचार केला ना समाजकारण किंवा सत्ताकारण करताना केला. मात्र आज महाराष्ट्राची स्थिती काय आहे? महाराष्ट्र आज जेवढा नाती-जाती-पोटजातींत फाटला आहे तेवढा याआधी कधीच विभागलेला नव्हता. किंबहुना, राज्याच्या सामाजिक एकोप्याच्या अशा काही चिंधडय़ा उडाल्या आहेत की, त्यास ठिगळं लावणेही जिकरीचे झाले आहे. जातीपातीचे झेंडे घेऊन कुणी रस्त्यांवर उतरले नव्हते, पण आज राज्यातील अठरापगड जाती व पोटजाती त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून दुसऱ्या जातीच्या नावाने जो शिमगा करतात व इतर जाती-पोटजातींना पाण्यात पाहून राज्याच्या भवितव्याचे डबके करतात ते पाहून बाळासाहेबांनंतर राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या एकात्मतेच्या कशा चिंधडय़ा उडवल्या आहेत ते स्पष्टच दिसते. भीमा-कोरेगाव प्रकरणाची आग अद्याप विझलेली नाही.

ती आग विझवणारा व खवळलेल्या समुदायास एका आदेशाने ‘शांत’ करणारा नेता उरलेला नाही. प्रबोधनकारांच्याच भाषेत सांगायचे तर गोळीला जनता आणि पोळीला पुढाऱ्यांची संख्या भरपूर आहे. किंबहुना जातीय शेकोटय़ांवर फक्त पोळय़ाच भाजण्याचे उद्योग सुरू आहेत. हा धोका शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना स्थापनेच्या वेळीच ओळखला होता. म्हणूनच एक मंत्र त्यांनी तेव्हाच दिला होता तो म्हणजे, मराठा-मराठेतर, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, शहाण्णव कुळी-ब्याण्णव कुळी, घाटी-कोकणी, स्पृश्य-अस्पृश्य हे भेदाभेद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा. या मंत्रानेच शिवसेना उसळून उभी राहिली व एक भक्कम महाराष्ट्र त्यांनी निर्माण केला. शिवसेना नव्हती तोपर्यंत महाराष्ट्र म्हणजे दिल्लीच्या वाटेवरील एक पायपुसणे होते. मुंबई, महाराष्ट्राची लूट करून थैल्या दिल्लीचरणी अर्पण करण्याचे लाचार उद्योग सुरू होते. बाळासाहेबांनी एक वज्रमूठ निर्माण केली. महाराष्ट्राकडे जो वाकडय़ा नजरेने पाहील त्याचे डोळे काढून हातात देणारी एक मर्द पिढीच त्यांनी भगव्या झेंडय़ाखाली तयार केली. या मर्द मावळय़ांच्या भयानेच भल्याभल्यांची गाळण उडाली. आज मात्र कोणीही येतो व महाराष्ट्रास टपली मारतो. मराठी माणसांची एकजूट तोडून ‘उपऱ्यां’चे राजकारण यशस्वी करण्याच्या सुपाऱ्या मराठीवालेच वाजवीत आहेत. बाळासाहेब योद्धा सेनापती होते. मराठी माणसांना सुखाचे दिवस दाखविण्यासाठी त्यांनी सतत पंचेचाळीस वर्षे लढा दिला. धनदांडगे व राज्यकर्त्यांच्या साम्राज्यशाहीशी टक्कर दिली. त्यांचे हे लोकोत्तर जीवन एक भव्य तुफानच होते. त्या तुफानाचा वेग प्रचंड असल्यामुळे त्याचे पडसाद महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या सीमा पार करून इतरत्र उमटले. 

बाळासाहेब मराठी माणसांचे मानबिंदू राहिले, आजही आहेत, पण जातीपातीत फाटलेला देश एकसंध ठेवायचा असेल तर ‘हिंदुत्त्वा’चा धागाच देशाला एकत्र ठेवू शकेल. जाती गाडून हिंदू म्हणून एकत्र करण्याचा राजकीय चमत्कार बाळासाहेबांनी केला. ते हिंदुहृदयसम्राट झाले ते लोकांच्या आशीर्वादाने. बाळासाहेबांच्याच हिंदुत्वाच्या पुण्याईचे फळ आजचे राज्यकर्ते चाखत आहेत. आज हिंदुस्थान संकटात आहे व हिंदुत्वात राजकीय स्वार्थाची भेसळ सुरू आहे. लोक शिवसेनाप्रमुखांच्या पायांवर लोटांगण घालत तेव्हा ते म्हणत, ‘‘मी राजा नाही, मी साधू नाही, माझे पाय धरू नका. मी तुमच्यासारखाच एक मनुष्य आहे.’’ त्यांचे म्हणणे खरेच आहे. ते माणूस होते, माणूस राहिले. आजच्या राजकारणातील माणूसपण साफ नष्ट झाले आहे. माणुसकी हाच त्यांनी खरा धर्म मानला. भुकेलेल्यास अन्न, तहानलेल्यास पाणी, उघडय़ांना वस्त्र्ा देणाऱ्या धर्मावर त्यांची श्रद्धा होती. गाडगे महाराज त्यांचा आदर्श होते. देवाच्या नावावर शिवसेनाप्रमुखांनी कधी राजकारण केले नाही. ईश्वरभक्तीविषयी त्यांनी कधी उपदेश केला नाही. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे’ हेच त्यांचे तत्त्व होते. बाळासाहेबांनी मराठी भाषेला ‘ठाकरी’ भाषेची धार दिली. त्यांनी भाषेला प्रौढता, परिणामकारकता व शैलीदारपणाही आणला. ‘ठाकरी’ ही त्यांनी राजकीय विषयाची परिभाषा बनवली. ‘ठाकरी’ वाणीचा नि लेखणीचा राष्ट्रावर एवढा प्रभाव पडला की, शिवसेनाप्रमुख काय म्हणतात ते समजण्यासाठी अनेक परभाषिक मराठी भाषा शिकले. मुंबई हे राष्ट्रीय राजकारणाचे एक केंद्र बनले. आज बाळासाहेबांचा जन्मदिवस. त्यांचे स्मरण सदैव होतच राहील. बाळासाहेब हे गरुडझेप घेणारे होते. बाकी सगळे पुंग्या वाजवणारे ‘गारुडी’ बनले आहेत. बाळासाहेब अमर आहेत! त्यांनी पेटविलेला यज्ञकुंडही अखंड धगधगत आहे.

 

Web Title: Uddhav Thackarey on Shivsena Pramukh Balasaheb Thackeray Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.