Join us

रोहिंग्यांना सहानुभूती दाखवणे ही देशद्रोहाची शेवटची सीमाच - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 9:04 AM

म्यानमारमधील राखीन प्रांतात रोहिंग्या मुस्लिमांवर होणा-या अन्यायाविरोधात भारतात गेल्या काही दिवसांपासून निदर्शनं, आंदोलन होत आहेत. यावरुन रोहिंग्या मुस्लिमांना पाठिंबा दर्शवणा-यांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून टीकास्त्र सोडले आहे. आजच्या सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसी यांना टार्गेट केले आहे.

मुंबई, दि. 23 - म्यानमारमधील राखीन प्रांतात रोहिंग्या मुस्लिमांवर होणा-या अन्यायाविरोधात भारतात गेल्या काही दिवसांपासून निदर्शनं, आंदोलन होत आहेत. यावरुन रोहिंग्या मुस्लिमांना पाठिंबा दर्शवणा-यांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून टीकास्त्र सोडले आहे. आजच्या सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांना टार्गेट केले आहे. ''रोहिंग्यांना म्यानमारमधून पलायन का करावे लागले याचे उत्तर येथील फडतूस मानवतावाद्यांनी आधी द्यावे. हिंदुस्थानातील मुसलमानांच्या मतांवर डोळा ठेवून रोहिंग्यांना सहानुभूती दाखवणे ही देशद्रोहाची शेवटची सीमाच म्हणावी लागेल. ज्यांना रोहिंग्या आपले भाऊ वाटतात अशा पुढाऱयांनी रोहिंग्यांसाठी हिंदुस्थानच्या बाहेर धर्मशाळा उघडाव्यात व त्यांच्याशी आपल्या पोरीबाळींचे निकाह जरूर लावावेत, पण हिंदुस्थानच्या मातीचा चिखल करून विझलेल्या तवंगावर पेटती काडी फेकू नये. रोहिंग्यांना भटके मानणारे मानवतेचे पुजारी नसून देशाचे दुश्मन आहेत. तेव्हा रोहिंग्यांची भाईगिरी तुमच्या लुंगीतच ठेवा!!'', अशा बोच-या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. 

काय आहे आजचे सामना संपादकीय?

हिंदुस्थानातील ओवेसीछाप ‘एमआयएम’सारखे पक्ष रोहिंग्या मुसलमानांची भलामण करीत असताना बाजूच्या बांगलादेशात रोहिंग्यांच्या विरोधात त्या देशाच्या पंतप्रधानांनीच जोरदार भूमिका घेतली आहे. म्यानमारने रोहिंग्या मुसलमानांना परत त्यांच्या देशात नेलेच पाहिजे असे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी ठणकावले आहे. शेख हसिना यांनी म्यानमारला स्पष्ट सांगितले आहे की, ‘रोहिंग्या हे तुमचे नागरिक आहेत. त्यांना परत घेऊन जावेच लागेल.’ बांगलादेशात सवाचार लाख रोहिंग्या मुसलमान घुसले आहेत. याउलट हिंदुस्थानातील एमआयएमसारखे पक्ष व त्यांचे ओवेसीसारखे पुढारी रोहिंग्यांना हिंदुस्थानने स्वीकारावे यासाठी मानवता व बंधुभावाचा आटापिटा करीत आहेत. बांगलादेश हा इस्लामी प्रजासत्ताक देश असूनही त्यांनी मुसलमान म्हणून रोहिंग्यांची ब्याद स्वीकारायला साफ नकार दिला; पण इकडे ओवेसी सांगतोय, ‘बांगलादेशची परागंदा लेखिका तस्लिमा नसरीनला ‘बहीण’ म्हणून स्वीकारले तसे रोहिंग्यांना भाऊ म्हणून स्वीकारा.’ रोहिंग्यांस मानवता दाखवून हिंदुस्थानातच आजन्म ठेवून घ्यावे. त्यांच्या पुढच्या पिढय़ान्पिढय़ा येथे पोसल्या जाव्यात यासाठी ओवेसींसारखेच काही

बनचुके ‘कायदेआजम’हिंदुस्थानच्या सर्वोच्च न्यायालयात लढे देत आहेत. तस्लिमा नसरीन ही बांगलादेशची लेखिका मुसलमानांतील धर्मांध व दहशतवाद याविरुद्ध लढत आहे व बांगलादेशातून तिला परागंदा व्हावे लागले. हिंदुस्थानात राहूनही तिने मुसलमानांची धर्मांधता व दहशतवादी कारवायांच्या विरोधात आवाज उठवण्याचे थांबविलेले नाही. पण रोहिंग्यांच्या बाबतीत तशी खात्री कुणी देऊ शकेल काय? आमच्या देशात चाळीस हजार रोहिंग्या मुसलमान सध्या राहत आहेत. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे त्यात रोहिंग्या मुसलमान बेकायदेशीररीत्या घुसल्याचे म्हटले आहे. देशाच्या सुरक्षेला हा धोका आहे व काही रोहिंग्यांचे ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी तसेच पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयबरोबर संबंध असल्याचेही स्पष्ट केले आहे. अशा रोहिंग्यांना हिंदुस्थानात ठेवा व पोसा असे सांगणारे कोणीही असोत, त्यांच्या रक्तात देशाभिमान नावाची चीज आहे की नाही? बाजूच्या मुसलमानी बांगलादेशातून रोहिंग्यांना हाकलले जात आहे व त्यासाठी म्यानमारवर आंतरराष्ट्रीय दबाव आणला जात आहे. मात्र त्याच वेळी हिंदुस्थानातील रोहिंग्यांची अवलाद वेगळीच भूमिका घेत आहे. अशा स्वार्थी मुस्लिम पुढारी आणि मुल्ला-मौलवींमुळेच हिंदुस्थानातील

सामान्य मुसलमान वर्गहा संशयाच्या फेऱयात कायम अडकला जातो. रोहिंग्यांना म्यानमारमधून पलायन का करावे लागले याचे उत्तर येथील फडतूस मानवतावाद्यांनी आधी द्यावे. हिंदुस्थानातील मुसलमानांच्या मतांवर डोळा ठेवून रोहिंग्यांना सहानुभूती दाखवणे ही देशद्रोहाची शेवटची सीमाच म्हणावी लागेल. जगभरातील मुसलमानांसाठी हिंदुस्थान म्हणजे ‘आव जाव घर तुम्हारा’ होऊ नये याची काळजी येथील राष्ट्रप्रेमी मुसलमान मंडळींनीदेखील घ्यायला हवी. आधीच येथे पाकडे व बांगलादेशी लाखोंच्या संख्येने घुसले आहेत. त्यात रोहिंग्यांची भर पडली म्हणजे जे म्यानमारमध्ये घडले तसे घडायला वेळ लागणार नाही व त्यात भरडले जातील ते येथील मूळ नागरिक असलेले मुसलमान. हे ज्यांच्या ध्यानात येत नाही त्यांच्या खोपडीत मेंदू नसून पाकडय़ांनी भरलेले विष आहे. ज्यांना रोहिंग्या आपले भाऊ वाटतात अशा पुढाऱयांनी रोहिंग्यांसाठी हिंदुस्थानच्या बाहेर धर्मशाळा उघडाव्यात व त्यांच्याशी आपल्या पोरीबाळींचे निकाह जरूर लावावेत, पण हिंदुस्थानच्या मातीचा चिखल करून विझलेल्या तवंगावर पेटती काडी फेकू नये. रोहिंग्यांना भटके मानणारे मानवतेचे पुजारी नसून देशाचे दुष्मन आहेत. तेव्हा रोहिंग्यांची भाईगिरी तुमच्या लुंगीतच ठेवा!!