सरकारचं बिंग फोडल्याबद्दल यशवंत सिन्हा बेइमान किंवा राष्ट्रद्रोही ठरतील - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 07:13 AM2017-09-28T07:13:46+5:302017-09-28T08:17:40+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत भाजपावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे

Uddhav Thackarey Slams BJP | सरकारचं बिंग फोडल्याबद्दल यशवंत सिन्हा बेइमान किंवा राष्ट्रद्रोही ठरतील - उद्धव ठाकरे

सरकारचं बिंग फोडल्याबद्दल यशवंत सिन्हा बेइमान किंवा राष्ट्रद्रोही ठरतील - उद्धव ठाकरे

Next

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत भाजपावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. यावेळी मात्र भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपाचेच ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या विधानाचा दाखला दिला. ढासळत्या अर्थव्यवस्थेच्या मुद्यावरुन बुधवारी यशवंत सिन्हा यांनी भाजपाला घरचा अहेर दिला. अरुण जेटली हे ‘सुपरमॅन’ आहेत, असे समजून वित्त मंत्रालयासह चार मोठ्या खात्यांचा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला. परंतु कामाच्या प्रचंड बोजामुळे जेटली वित्त मंत्रालयास न्याय देऊ न शकल्याने त्यांनी देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली, अशी सडेतोड टीका यशवंत सिन्हा यांनी केली.  देशाचा विकास दर हा ५.७ टक्के असल्याचे सांगितले जाते. तो प्रत्यक्षात ३.७ टक्केच असल्याचे बिंग फोडल्याबद्दल यशवंत सिन्हा हे बेइमान किंवा राष्ट्रद्रोही ठरवले जाऊ शकतात, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला हाणला आहे.

काय आहे आजचे सामना संपादकीय?

गुजरातच्या विकासाचे काय झाले? असा सवाल करताच ‘विकास गांडो थयो छे!’ म्हणजे ‘विकास वेडा झाला आहे,’ असे उत्तर आता गुजराती जनता देत आहे. फक्त गुजरातच कशाला, संपूर्ण देशभरातच ‘विकास गांडो थयो छे’ म्हणजे विकास वेडा झाल्याचे चित्र भारतीय जनता पक्षाचेच वरिष्ठ मंडळ समोर आणीत आहे. ‘‘विकासाबाबत काहींनी पुष्कळ थापा मारल्याने विकास वेडा झाला असावा,’’ अशी शहाणपणाची टिप्पणी राहुल गांधी यांनी केली आहे. ई.व्ही.एम. मशीनमध्ये घोटाळे करून व पैशांचा वापर करून निवडणुका जिंकल्या म्हणजे विकास झाला असे काहींना वाटत आहे, पण विकासाची अवस्था बिकट झाली आहे. मनमोहन सिंग, चिदंबरम अशा ‘अर्थतज्ञां’नी कालपर्यंत हेच सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा मनमोहन सिंग व चिदंबरम हेच ‘गांडो थयो छे’ असे सांगण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता अर्थमंत्री पदावर प्रदीर्घ काळ राहिलेले हे लोक मूर्ख व आपण तेवढे शहाणे या भ्रमाचा भोपळा यशवंत सिन्हा या भाजपच्याच माजी अर्थमंत्र्यांनी फोडला आहे. देशाचा विकास दर हा ५.७ टक्के असल्याचे सांगितले जाते. तो प्रत्यक्षात ३.७ टक्केच असल्याचे बिंग फोडल्याबद्दल यशवंत सिन्हा हे

बेइमान किंवा राष्ट्रद्रोही

ठरवले जाऊ शकतात. रशियात स्टॅलिन राजवटीत सरकारविरुद्ध मत मांडणारे, सत्य बोलणारे अनेक लोक एका रात्रीत गायब होत किंवा त्यांची रवानगी श्रम छावण्यांत होत असे. यशवंत सिन्हा यांना सत्य सांगितल्याबद्दल कोणत्या शिक्षेस तोंड द्यावे लागेल ते पाहू. पण नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेचा कसा फज्जा उडाला व देशात आर्थिक मंदीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर सिन्हा यांनी झोत टाकला आहे. विकास दर घसरत असताना नोटाबंदीचा जो निर्णय घेतला तो आगीत तेल ओतण्यासारखाच आहे, असेही सिन्हा म्हणतात. सध्या अनेक बाबतीत सरकारी योजनांची वाताहत सुरू असली तरी जाहिरातबाजीचे डोस देऊन यशाचे ढोल वाजवले जात आहेत. उद्योग, मेक इन इंडियासारखे ‘मोदी फेस्ट’ कसे अपयशी ठरत आहेत व कोटय़वधी रुपयांची उधळण करूनही जनतेने या ‘फेस्ट’कडे कशी पाठ फिरवली आहे ते विदारक चित्र प्रसिद्धीमाध्यमांनी उघडे पाडले आहे. हिंदुस्थानातील उद्योगधंदे घसरणीस लागले आहेत. त्यामुळे रोजगाराच्या संधी नव्याने निर्माण होण्याऐवजी जे नोकरीत आहेत त्यांचाच रोजगार बुडत आहे. बँकांची अनेक खाती बुडाली आहेत. पेट्रोल-डिझेलचे भाव भयंकर वाढले आहेत. खासगी गुंतवणुकीत घट आली आहे. गेल्या दोन दशकांत

इतकी कमी गुंतवणूक

कधीच झाली नव्हती. कृषीक्षेत्रही संकटात आहे. निर्यातीची अवस्था बरी नाही, असे यशवंत सिन्हा सांगत आहेत. सिन्हा हे अक्कलशून्य असतील तर त्यांनी केलेले आरोप सपशेल खोटे आहेत हे सिद्ध करून दाखवा. भारतीय जनता पक्षातील अनेक लोकांत ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून खदखद आहे. अनामिक भीतीपोटी कोणी बोलायला तयार नाहीत. देशाचे मोठे नुकसान सुरू आहे. यावर मी शांत बसलो तर राष्ट्रीय कर्तव्य निभावण्यात मी अपयशी ठरेन. त्यामुळे आता मला बोलावेच लागेल, असा तोफखाना यशवंत सिन्हा यांनी सोडला आहे. सिन्हा हे कोणी ऐरेगैरे नाहीत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. त्यामुळे त्यांची विधाने फक्त सोशल मीडियावर नेमलेल्या पगारी प्रचारकांच्या फौजा सोडून खोडता येणार नाहीत. ‘मी गरिबी अतिशय जवळून अनुभवली आहे,’ असे पंतप्रधान अनेकदा सांगतात. देशभरातील जनतेने याच गरिबीचा अनुभव घ्यावा यासाठी पंतप्रधानांचे अर्थमंत्री मेहनत घेत आहेत, असे यशवंत सिन्हा म्हणतात. यावर आम्हाला काहीच म्हणायचे नाही. हे सर्व आम्ही वर्षभरापूर्वीच सांगितले होते. तेव्हा आम्ही देशद्रोही ठरलो होतो. आता यशवंत सिन्हा ठरतील!

Web Title: Uddhav Thackarey Slams BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.