पाकप्रेमाचा चीनचा थयथयाट म्हणजे पुतनामावशीचा पान्हा - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 10:34 AM2017-09-27T10:34:28+5:302017-09-27T10:41:31+5:30
संयुक्त राष्ट्रसंघासमोर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दहशतवादावरुन पाकिस्तानची तीक्ष्ण शब्दांत कानउघाडणी केली. यावरुन पाकिस्तानची पाठराखण करत चीननं पुन्हा एकदा भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला.
मुंबई - संयुक्त राष्ट्रसंघासमोर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दहशतवादावरुन पाकिस्तानची तीक्ष्ण शब्दांत कानउघाडणी केली. यावरुन पाकिस्तानची पाठराखण करत चीननं पुन्हा एकदा भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. संयुक्त राष्ट्रसंघासमोर पाकिस्तानवर टीका करणा-या देशाच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या अहंकारी आहेत, असे चिनी मीडियानं म्हटले होते. यावरुनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून चीनसहीत पाकिस्तानवर टीकास्त्र सोडले आहे.
काय आहे आजचे सामना संपादकीय?
चीनचे पाकिस्तानप्रेम अलीकडे नेहमीच उफाळून येत असते. प्रामुख्याने विषय हिंदुस्थानशी संबंधित असला तर चिन्यांच्या पाकप्रेमाच्या भरतीच्या लाटा उंचच उंच उसळतात. आतादेखील संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत बोलताना हिंदुस्थानच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला दहशतवादावरून तीक्र शब्दांत फटकारले होते. हिंदुस्थानच्या या बोचऱ्या टीकेमुळे पाकिस्तानचा जळफळाट होणे अपेक्षितच होते. मात्र चीननेदेखील थयथयाट केला आहे. हिंदुस्थानची ही टीका ‘अहंकारी’ आहे असे चीनने म्हटले आहे. शिवाय पाकिस्तानात दहशतवाद आहे हे खरे असले तरी त्या दहशतवादाचे समर्थन करणे पाकिस्तानची राष्ट्रीय भूमिका आहे का, असा उफराटा प्रश्न विचारून आपल्या पाकप्रेमाचा दाखला पुन्हा एकदा दिला आहे. अर्थात, चीन आणि पाकिस्तान यांचे हे ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ नवीन नाही. हिंदुस्थान हा दोघांचा समान शत्रू आहे. जागतिक महासत्ता होण्याबरोबरच आशिया खंडावरही एकहाती वर्चस्व ठेवण्याची चीनची महत्त्वाकांक्षा आहे. त्यासाठी मुख्य अडथळा अर्थातच हिंदुस्थान आहे. आधीच शत्रुत्व असलेला हिंदुस्थान आपल्या भविष्यातील महत्त्वाकांक्षेच्या आणि विस्तारवादी धोरणाच्या आड येण्याची शक्यता असल्याने हिंदुस्थानच्या प्रत्येक गोष्टीला ‘आडवे’ जाण्याचे धोरण चीनने ठेवले आहे. त्यासाठी त्याला
पाकिस्तानसारखा देश सोबतीला
असणे सोयीचे आहे. त्यासाठीच हिंदुस्थानविरोधाचे उपद्व्याप अधूनमधून चिनी माकडे करीत असतात. मग तो ‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’चा विषय असो की त्यानिमित्ताने पाकव्याप्त कश्मीरमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न असो, चिनी माकडांचे शेपूट पाकडय़ांप्रमाणे नेहमी वाकडेच राहिले आहे. पाकिस्तानचे ग्वादर हे सामरिकदृष्टय़ा महत्त्वाचे बंदर विकसित करण्याच्या नावाखाली ताब्यात घेण्यामागेही चीनचा उद्देश हिंदुस्थानवर सागरी मार्गाने ‘लक्ष्य’ ठेवणे हाच आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्र संघातर्फे दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या हिंदुस्थानच्या प्रयत्नांना प्रत्येक वेळी खो घालण्याचा उद्योगही चीनने केला तो पाकिस्तानला गोंजारण्यासाठीच. संयुक्त राष्ट्रातील कायम सदस्यत्व असो किंवा ‘आण्विक पुरवठादार गटा’त (एनएसजी) प्रवेश करण्याचा हिंदुस्थानचा प्रयत्न असो, त्यातही चीनने आतापर्यंत खोडाच घातला आहे. त्यामागे हिंदुस्थानचा प्रभाव वाढू न देण्याचा जसा उद्देश आहे तसेच पाकिस्तानचे ‘लांगूलचालन’ही आहे. आतादेखील हिंदुस्थानी परराष्ट्रमंत्र्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पाकडय़ांचा दहशतवादी चेहरा उघड केला म्हणून चीनने
अकांडतांडव करण्याचे
आणि या भाषणाला ‘अहंकारी’, ‘उद्धट’ म्हणण्याचे तसे काहीच कारण नव्हते. मात्र पाकिस्तानच्या दुखऱ्या भागावर प्रेमाची गुळणी टाकण्याची नौटंकी चीनने केलीच. पूर्वी असेच पाकप्रेमाचे भरते अमेरिकेला वर्षांनुवर्षे येत होते. आता तो पान्हा आटला आहे. कारण आशियाई आणि जागतिक परिस्थिती, अमेरिकेची सामरिक धोरणे बदलली आहेत. पाकिस्तानला मांडीवर बसवण्याची गरज अमेरिकेला तेवढी राहिलेली नाही. म्हणूनच पाकडय़ांनी अमेरिकेचे बोट सोडून चीनचे शेपूट पकडले आहे आणि चिन्यांनीदेखील पाकिस्तानला डोक्यावर घेतले आहे. अमेरिकेच्या पाकप्रेमामागे हिंदुस्थानला ‘दबावा’मध्ये ठेवण्याचाच उद्देश होता. आता चीनला फुटणाऱ्या पाकप्रेमाच्या धुमाऱ्यांमागचा हेतूदेखील तोच आहे. अर्थात अमेरिका काय किंवा चीन काय, पाकिस्तान या देशांच्या हातचे बाहुलेच बनला आहे. दोन्ही देशांनी त्याचा वापर एखाद्या प्याद्यासारखाच केला आणि करीत आहेत. मात्र हिंदुस्थानद्वेषाच्या सूडाग्नीने आंधळे झालेले पाकिस्तानी राज्यकर्ते आणि लष्करशहा यांना हे कसे दिसणार आणि कसे समजणार? संयुक्त राष्ट्रात हिंदुस्थानने पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड केला म्हणून पाकप्रेमाचा गळा काढून चीनने जो थयथयाट केला तो पुतनामावशीचा पान्हा आहे. पाकिस्तानला हे समजूनही वळत नाही हे त्या देशाचे दुर्दैव. भविष्यात कदाचित पाकिस्तानला त्याची जाणीव होईलही, पण तोपर्यंत तो देश चिनी ड्रगनच्या वेढ्यात पूर्णपणे जखडला गेलेला असेल.