Uddhav Thackarey: सापाच्या पिल्लाला आम्ही 30 वर्षे दूध पाजलं, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 11:34 PM2022-03-02T23:34:59+5:302022-03-02T23:35:57+5:30
दहशतवाद्याशी संबंधित जमिनीचा व्यवहार करुन त्याला सहकार्य करायचच कशाला? असे सवाल उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या होत असून त्या पार्श्वभूमीवर सत्ताधार आणि विरोधी पक्षनेत्यांनी बैठक घेऊन पत्रकार परिषद घेतली. यावेळी, ईडीच्या कोठडीत असलेले राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज आक्रमक झाल्याचं दिसून आलं. मुंबईच्या खुन्यासोबत व्यवहार केलेल्या मंत्र्याला पाठिशी घालून ठाकरे सरकार काय सिद्ध करु पाहातंय? मुंबईच्या खुन्यासोबतचा व्यवहार महाराष्ट्र कधीच खपवून घेणार नाही, असे म्हणत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही यास प्रत्युत्तर देत भाजपवर प्रहार केला.
दहशतवाद्याशी संबंधित जमिनीचा व्यवहार करुन त्याला सहकार्य करायचच कशाला? असे सवाल उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्याच्या अधिवेशनात मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा पक्ष संघर्ष करेल असंही ते म्हणाले.
ज्या सरकारमध्ये दाऊदप्रती सहानुभूती ठेवणारे लोक ठेवले आहे, त्या सरकारच्या चहापानाला आम्ही जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असंही फडणवीसांनी यावेळी जाहीर केलं. त्यानंतर, संध्याकाळी चहापान कार्यक्रम झाला.
अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या चहापान आणि पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक बंगल्यावर आयोजित बैठकीसाठी पोहचले होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी, भाजपवर जोरदार निशाणा साधला. तसेच, सापाच्या पिलाला आम्ही ३० वर्षे दूध पाजले, ते पिल्लू वळवळ करत होतं आता आमच्यावरच फुत्कारत आहे. सध्या देशात एक विकृती आहे, एक घृणास्पद राजकारण सुरू असून विकृतीपेक्षा घाणेरडेपणा असल्याचे मुख्यमंत्री ठाकरेंनी म्हटलं.
मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
हिम्मत आहे तर दाऊदला शोधून का आणत नाहीत. तिकडे पाकिस्तानला जाऊन नवाज शरीफचा केक खाता, थडग्यांवर माथा टेकवता, मग दाऊदच्या मुसक्या का आळवत नाहीत.
आज इकडे धाड पाडतायेत तिकडे धाड पाडतायेत, याला अटक करतायेत, त्याला अटक करतायेत. मात्र, आता हे खपवून घ्यायचं नाही
आपली एकजूट आपली ताकद आहे. आम्ही कोणावर वार करत नाही, पण वार केला तर आम्ही सोडणार नाही.
सरकार पडणार, सरकार पडणार... माझे १७० मोहरे फोडून दाखवाच. मला सोडून ते तुमची गुलामगिरी पत्कारणार नाही
काही लोक दाऊदकडची धुणीभांडी करताय - फडणवीस
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच एका मुलाखतीत "तुम्ही देशातली सत्ताही घेतली, महाराष्ट्रातलीही तुम्हाला हवी, ग्रामपंचायत, सोसायट्याही तुम्हाला हव्यात, मग आम्ही धुणीभांडी करायची का?", असा टोला भाजपाला लगावला होता. त्यावरही फडणवीसांनी आज प्रत्युत्तर दिलं.
"त्यांनी काय करायचं हे त्यांनी ठरवावं. पण त्यांच्यातले काही लोक दाऊदकडची धुणीभांडी करतायत. ती आधी बंद करायला लावा. दाऊदपुढे झुकणार आणि महाराष्ट्र झुकणार नाही ही जी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतेय, ती आधी बंद झाली पाहिजे.