Uddhav Thackeray: मुंबई'कर' म्हटल्यावर कायम करच भरायचे का?; उद्धव ठाकरेंनी दिलं नववर्षाचं गिफ्ट...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 04:34 PM2022-01-01T16:34:34+5:302022-01-01T16:34:58+5:30
सरकारनं मुंबईतील ५०० स्केअर फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे
मुंबई-
मुंबईकर म्हटल्यावर मुंबईकरांनी काय फक्त करच भरायचे का? मुंबईकरांना सेवा देखील तितक्याच चांगल्या मिळाल्या पाहिजेत या उद्देशातून आणि शिवसेनेनं वचननाम्यात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आज सरकारनं मुंबईतील ५०० स्केअर फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईतील ५०० स्वेअर फुटांखालील घरांवरील मालमत्ता कर माफ करण्याच्या निर्णयाला अखेर आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आणि निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचेही आदेश प्रशासनाला दिले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर देखील भाष्य केलं.
जनतेला खोटी वचनं द्यायची नाहीत असे संस्कार शिवसैनिकावर आहेत. निवडणुकीआधी शिवसेनेच्या वचननाम्यात मुंबईकरांना ५०० स्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करणार असं आश्वासन दिलं होतं. ते आज पूर्ण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"१९६६ पासून जन्माला आलेली शिवसेना मुंबईकरांच्या आशीर्वादाने मुंबई सांभाळतेय. आमची ही चौथी पिढी, आजोबा,वडील, मी आणि आता आदित्य. काम म्हणून नाही, कर्तव्य म्हणून नाही तर मुंबईवरचं प्रेम आम्ही पुढे नेत आहोत. शिवसेनाप्रमुख स्वत: जाऊन कामाची पहाणी करत. मी ही नालेसफाई, दहिसर नदीचे काम असेल किंवा सौंदर्यीकरणाचे काम असेल ते जाऊन पहात होतो आता हे काम आदित्य करत आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
लवकरच कोरोनावर बोलेन
राज्यातील कोरोना रुग्णवाढीच्या मुद्द्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी थोडक्यात मत व्यक्त केलं. राज्यात कोरोना रुग्ण वाढतायत आणि प्रशासनाचं परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष आहे. परिस्थिती पाहून लवकरच कोरोनावरही बोलेन, पण नागरिकांनी आता जास्त काळजी घेण्याची आणि नियमांचं पालन करण्याची गरज आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.