Join us

Uddhav Thackeray Shiv Sena: "ठाकरे कुटुंबीयांचे फोटो बॅनरवरून हटवले तरी मनात कायम राहतील"; बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांची भावनिक प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 7:25 PM

प्रताप सरनाईक हे एकनाथ शिंदे गटातील ठाण्याचे आमदार

Uddhav Thackeray Shiv Sena: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली आणि ५० आमदारांच्या साथीने भाजपासोबत सरकार स्थापना केली. त्यानंतर आता शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट असा संघर्ष शिवसेनेत सुरू आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या समर्थनार्थ लागणाऱ्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असला तरी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो दिसत नाही. याच संदर्भात आज शिंदे गटातील बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांनी एक अतिशय भावनिक अशी प्रतिक्रिया दिली. ठाकरे कुटुंबीयांचे फोटो बॅनरमधून काढले जातील पण आमच्या हृदयातून नाही, असे ते म्हणाले.

सध्या राज्यात शिवसेनेत दोन गट पडले आहेत. शिंदे गटातील आमदार-खासदार आणि समर्थक उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व अमान्य असल्याचे जाहीरपणे बोलू लागले आहेत. औरंगाबादचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या कार्यालयातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा फोटो हटवल्याची घटना घडली आहे. या साऱ्या गोंधळानंतर शिंदे गटातील आमदारा प्रताप सरनाईक यांनी मात्र एक भावनिक प्रतिक्रिया दिली. "ज्या विचारांवर आम्ही मतं मागितली, तो विचार पाहूनच लोकांनी आम्हाला मतं दिली. आता त्या विचारांचे सरकार राज्यात सत्तेत आहे. सध्या बॅनर, वृत्तपत्र, जाहिराती यांमधून जरी ठाकरे कुटुंबीयांचे फोटो काढले जात असल्याचे दिसत असेल तरी त्यांचे फोटो आमच्या हृदयातून कोणीही काढू शकणार नाही. ठाकरे कुटुंबियांचा फोटो माझ्या हृदयात शेवटपर्यंत राहिल", असे प्रताप सरनाईक म्हणाले.

दरम्यान, बंडखोर आमदारांनी हळूहळू उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व अमान्य करण्यास सुरूवात केली आहे. सुरूवातीला उद्धव ठाकरे किंवा ठाकरे परिवारावर टीका करायची नाही, असा दंडक असलेला शिंदे गट आता उघड-उघड उद्धव व आदित्य ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर देताना दिसत आहे. यावर आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली. 'आता बंडखोरांचा खरा चेहरा समोर यायला सुरुवात झाली आहे. गेले महिनाभर हे बंडखोर म्हणत होते की, आमचे उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम आहे. आदित्य ठाकरे हे आमच्यासाठी मुलासारखे आहेत. पण आता यांचे खरे रूप दिसू लागले आहे. गद्दार हे गद्दारच असतात. त्यांनी हिंमत असेल तर राजीनामे द्यावे आणि निवडणुकांना सामोरं जावं म्हणजे जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल', अशी भावना आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली.

टॅग्स :प्रताप सरनाईकएकनाथ शिंदेउद्धव ठाकरेआदित्य ठाकरे