Join us

Uddhav Thackeray: "माझ्या हातात आज काही नाही, पण...", कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना उद्धव ठाकरे भावूक!

By मुकेश चव्हाण | Published: February 18, 2023 3:08 PM

Uddhav Thackeray: पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा मातोश्रीबाहेर येऊन शिवसैनिकांना संबोधित केले.

मुंबई- पक्षाचे नाव आणि चिन्ह यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा शेवट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने शुक्रवारी झाला. शिवसेना हे पक्षाचे नाव व धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा ताबा राहणार आहे. उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्षप्रमुख पद लोकशाही तत्त्वाचे पालन करून तयार केलेले नव्हते, असे नमूद करून आयोगाने ठाकरे यांना जबरदस्त धक्का दिला.

नाव अन् चिन्ह मिळवलं; एकनाथ शिंदेंचं आता नवीन लक्ष्य, उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का देण्याची रणनिती

यापूर्वी शिंदे यांच्या नेतृत्वातील 'बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष व त्यांचे ढाल- तलवार हे निवडणूक चिन्ह आयोगाने गोठविले आहे. त्याचबरोबर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा पक्ष व त्यांचे मशाल हे निवडणूक चिन्ह यांची मुदत केवळ चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंत असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाने घटनेच्या ३२४ कलमांन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करत पक्षाचे नाव आणि चिन्ह यांचे वाटप केल्याचे म्हटले आहे. 

पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा मातोश्रीबाहेर येऊन शिवसैनिकांना संबोधित केले. आज सकाळपासूनच मातोश्रीबाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले होते. त्यांना संबोधित करण्यासाठी उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबियांसह बाहेर आले आणि ओपन कारमधून भाषण केलं. यावेळी शिवधनुष्य चोरीला गेलंय. निवडणुकीत गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिला. 

पुढे बाळासाहेब ठाकरे अन् मागे...; पक्षाचं नाव अन् चिन्ह गेल्यावर आदित्य ठाकरेंनी शेअर केला फोटो

कपट कारस्थानाचं राजकारण सुरू आहे. शिवसेना संपवण्याचं काम सुरु आहे. मात्र शिवसेना संपवता येणार नाही. धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो, असं म्हणत आता लढाई सुरु झालीय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच आज माझ्याकडे काहीच नाही, परंतु मी खचलेलो नाही, खचणारही नाही, असं म्हणताना उद्धव ठाकरे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आजपासूनच निवडणुकांच्या तयारीला लागा, चोरांचा आणि चोर बाजारांचा आपण नायनाट करू, असा आदेश देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना दिला. 

निवडणूक आयोगाचा निर्णय घातक-

निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय घातक निर्णय आहे. देशाचे स्वातंत्र्य संपले आहे, आता आम्ही बेबंदशाहीली सुरुवात केली आहे, असे पंतप्रधानांनी लाल किल्यावरुन जाहीर करावे. हा निर्णय अत्यंत अनपेक्षित आहे. चोरांना राज्यमान्यता देणे त्यांना भूषणाव वाटत असेल, पण चोर हा चोरच असतो. आज मिंध्ये गटाची आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाची दयनीय अवस्था झाली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाएकनाथ शिंदे