Join us

Uddhav Thackeray: 'बंडखोरांनी शिवसेनेत फूट पाडली नाही, तर...'; उद्धव ठाकरेंनी आज पुन्हा ठणकावलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 5:00 PM

संघर्षाला ठाकरे घाबरत नाही. हे दिवसही जातील, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना दिला.

मुंबई- शिवसेनेच्या आमदारांसोबत आता खासदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर असताना या खासदारांनी त्यांची भेट घेतली. पक्षाच्या एकूण १९ खासदारांपैकी १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यामुळे आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेला खासदारांनीही धक्का दिला आहे. 

एकीकडे पक्षातील खासदार, आमदार, नगरसेवक शिंदे गटात सहभागी होत असताना दूसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दररोज शिवसेना भवनात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. आज उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील उत्तर भारतीय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधला. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, पण धनुष्य हे माझ्याकडे आहे, लक्षात ठेवा. शिवसेनेत बंडखोरांनी फूट पाडली नाही तर ती भाजपाने पाडली आहे. भाजपाच शिवसेनेला संपवत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच सध्या शिवसेनाचा कठीण काळ सुरु आहे. मात्र संघर्षाला ठाकरे घाबरत नाही. हे दिवसही जातील, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना दिला. मैदानात उतरु पुन्हा पक्ष नव्याने बांधू, शिवसेना पुन्हा उभी करु, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करायला हवं. माझी हकालपट्टी करण्यात आलेली नाही. त्याआधीच मी राजीनामा दिला आहे आणि उद्धव ठाकरे अशी किती जणांची हकालपट्टी करणार आहेत?, असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीच शिवसेना संपवल्याचा आरोपही रामदास कदम यांनी केला. 

ज्या दिवशी ही महाविकास आघाडी बनत होती. त्याचवेळी मी विरोध केला होता. पण माझं ऐकलं गेलं नाही. शिवसेनेसाठी आयुष्याची ५२ वर्ष खर्च केली. त्याच रामदास कदमला मातोश्रीवर बोलावून माध्यमांमध्ये बोलायचं नाही असा आदेश मला उद्धव ठाकरेंनी दिला. तो मी मानला. गेल्या तीन वर्षांपासून मी तोंड बंद ठेवून बुक्क्यांचा मार सहन करत आहे. तरीही आज तुम्ही माझी हकालपट्टी करायला निघालात. याबद्दल मला खूप आजही वेदना होतात. माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. पण मी बोलत नाहीय. कारण मी बोललो तर भूकंप होईल. बाळासाहेबांमुळे मी अजूनही शांत आहे, असं रामदास कदम म्हणाले.   

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाभाजपामहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ