Uddhav Thackeray: कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा ३० वर्षांचा बालेकिल्ला ढासळला. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पोटनिवडणूक जिंकत महाविकास आघाडीत नवचैतन्य आणल्याचे सांगितले जात आहे. यातच रवींद्र धंगेकर यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर येऊन आभार भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यातच उद्धव ठाकरेंना २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी तुम्ही पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार का, यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली.
उद्धव ठाकरे पंतप्रधानपदासाठी उत्तम चेहरा असल्याचे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. विरोधी पक्षात जे प्रमुख चेहरे आहेत, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा चेहरा अनेकांना महत्त्वाचा वाटतो. कारण एकतर महाराष्ट्र मोठे राज्य आहे. ते ठाकरे आहेत. ते हिंदुत्ववादी आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. राजकारणात काहीही घडू शकते. उद्धव ठाकरे हा पंतप्रधानपदासाठी एक उत्तम चेहरा आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर आता खुद्द उद्धव ठाकरेंना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.
२०२४ मध्ये लोकसभेसाठी तुम्ही पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार का?
यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या मनात असे कोणतेही स्वप्न नाही. स्वप्नात रंगणारा आणि दंगणारा नाही. जी जबाबदारी येते ती पार पाडतो. तशीच माझ्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली होती. कसे ते पद स्वीकारावे लागले, त्या खोलात जाण्याची गरज नाही. मात्र, असे काहीही माझ्या मनात नाही. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम सर्वसामान्य नागरिकांनी खांद्यावर घेणे गरजेचे आहे, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातील कटुतेवर केलेल्या विधानावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्यासोबत जे गेले नाहीत त्यांच्यावर कारवाई होते, ते काय आहे? राजन साळवी, वैभव नाईक, अनिल परब आणि नितीन देशमुख यांच्यावर जे चालले आहे, ती सूड भावना नाहीये का? हा बदला नाहीये का? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली. रोज उठून ठाकरेंविरोधात शिमगा करून काही होत नाही. लवकरच खोकेवाल्यांची होळी होणार आहे, असा इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"