Uddhav Thackeray PC News: बदलापूर प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. यावरून काँग्रेसने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या बंदबाबत भाष्य केले. शनिवार, २४ ऑगस्ट रोजी पुकारण्यात आला आहे. हा बंद विकृती विरुद्ध संस्कृती, यासाठी आहे. हा बंद राजकारणासाठी नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपली मुलगी शाळेत सुरक्षित राहील का? असा प्रश्न पालकांना पडला आहे. आपली मुलगी कार्यालयात सुरक्षित आहे का? असा प्रश्न माता-भगिनींना पडला आहे. याला वाचा फोडण्यासाठी आम्ही बंद पुकारला आहे. आम्ही विकृतीविरोधात बंद पुकारलेला आहे. बंदचे यशापयश हे विकृती आणि संस्कृतीचे असणार आहे. आपल्या माता-भगिनींची सर्वांना चिंता आहे, हे सरकारला दाखवून दिले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
दुपारी दोनपर्यंत कडकडीत बंद पाळा
हा बंद महाराष्ट्राच्या जनेतसाठी आहे. हा बंद महाविकास आघाडीचा बंद नाही तर सर्व जनतेचा बंद आहे. सर्वांनी या बंदात सहभागी व्हा तसेच उद्याचा बंद कडकडीत असावा. बंद काळात ज्या अत्यावश्यक सेवा आहे त्या चालू राहतील. दुपारी दोन वाजेपर्यंत हा बंद पाळावा. दुकानदारांनाही उद्या बंद पाळावा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. हिंसा होऊ नये माझी इच्छा आहे. पोलीस महासंचालिका यांनी लाडकी बहीण व्हावे, मध्ये येऊ नये. पोलिसांनी दादागिरी करू नका. सरकार अकार्यक्षम असले तरी जनतेला सक्षम व्हावे लागते. या बंदचा फज्जा उडवू नका, नाही तर जनता दोन महिन्यांनी तुमचा फज्जा उडवेल. लोकल आणि बस सेवा ही बंद ठेवायला हवी, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बदलापूर प्रकरणातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले पाहिजेत. नाहीतर आम्हाला उद्या रस्त्यावर उतरावं लागेल. आम्ही लाडकी बहीण योजनेच्या विरोधात नाही, पण सुरक्षित बहीण महत्त्वाची आहे. आता संतापचा कडेलोट होत आहे, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.