मुंबई – आज मी अस्वस्थ आणि उद्विग्न आहे, आरोग्य यंत्रणेचे बारा वाजलेत ते बघितल्यानंतर संताप येतोय. जगभरात कोरोनाचं संकट होतं, तेव्हा महाराष्ट्रात मी मुख्यमंत्री होतो. कोरोना काळात हीच आरोग्य यंत्रणा होती, परंतु सरकार बदलल्यानंतर आरोग्य यंत्रणेची दुर्दशा झालीय. याच आरोग्य यंत्रणेने जीवाची बाजी लावून कोरोना काळात काम केले, औषधे दुर्गम भागात पोहचवण्याचे कामही याच यंत्रणेने केले होते पण योद्धासारखे लढणाऱ्यांना आज बदनाम केलं जातेय असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी राज्य सरकारवर घणाघात केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, नांदेड, नागपूर, ठाणे अजूनही अनेक ठिकाणच्या बातम्या येतायेत, या शासकीय रुग्णालयातील मृत्यूंना जबाबदार कोण? इथे हॉस्पिटलमध्ये मृत्यू होताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत बसलेत. जेवढे बळी नक्षली हल्ल्यात गेले नसतील तितके शासकीय रुग्णालयात गेले आहेत. मुख्यमंत्री आणि २ हाफ उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी करून त्याचे कारण शोधले पाहिजे होते. जे गुन्हेगार असतील तर त्यांना शिक्षा द्या, पण नांदेडच्या डीनवरच कारवाई का? नागपूर, ठाणे इथल्या डीनवर कारवाई नाही. हे संशयास्पद आहे. धमकावण्यासाठी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय का? रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे. आरोग्य खाते विभागले गेलेत. बाहेरून औषधे खरेदी करा असं सांगितले जातंय. केंद्र, राज्य शासनाच्या योजनेतून औषधांची खरेदी होऊ शकते. कोरोना काळात औषधांचा तुटवडा नव्हता, सध्या भ्रष्टाचाराची साथ आहे असा आरोप त्यांनी केला.
तसेच मुख्यमंत्री सहायत्ता निधी कक्षातून कुणाला मदत होतेय, ती बिले कुणाला मिळतायेत याचीही चौकशी व्हायला हवी. शासकीय औषधे निविदेशिवाय काढणार आहेत. त्याचीही चौकशी झाली पाहिजे. खेकड्यांच्या हाती कारभार गेलाय का? नुसते मृतांच्या नातेवाईकांच्या मदत देऊन भागतंय का? जाहिराती करायला पैसे आहेत. खोके सरकार म्हटलं जाते, गुवाहाटी, सूरत, गोव्याला जाऊन मजामस्ती करायला यांच्याकडे पैसे आहेत. परंतु महाराष्ट्रातील लोकांचे जीव वाचवण्यासाठी पैसे नाहीत. याची निष्पक्ष चौकशी व्हायला पाहिजे असंही उद्धव ठाकरे यांनी मागणी केली.
दरम्यान, अजित पवार हे आमच्यासोबत होते, विरोधी पक्षनेते असताना भरसभेत कोर्टाच्या ताशेऱ्यांवर बोलले होते. कोर्टाने नंपुसक असल्याचे म्हटलं होते. हे सरकार आता लवकरात लवकर घालवले पाहिजे. कारण आता जनतेचे बळी जातायेत, मी महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिक, पदाधिकारी यांना आवाहन करतो, आपापल्या जिल्ह्यात, तालुक्यात शासकीय रुग्णालयात जाऊन तिथल्या डॉक्टरांना विश्वासात घेऊन औषधे किती पोहचली, कधीपासून औषधांचा तुटवडा आहे याची माहिती घ्या, ज्यांना हाफकीन माहिती नाही असे मंत्री खात्याचा कारभार सांभाळणार असतील तर पहिले त्यांच्या बुद्धीवर उपचार व्हायला हवेत. परदेशवारीला पैसे परंतु औषध खरेदीला नाही. पेशंट टेबलवर आणि डॉक्टर दौऱ्यावर असा उथळ कारभार सुरू आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांना जाब विचारला पाहिजे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.