Join us

विधानसभा निकालांच्या पूर्वसंध्येला राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 10:53 PM

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला भाजपा नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला भाजपा नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबतच्या युतीचा फायदा करून घेतला आहे, असे नारायण राणे म्हणाले. तसेच कणकवलीमध्ये येऊन उद्धव ठाकरे यांनी केवळ माझ्याविरोधात जळफळाट व्यक्त केला, केला असा टोलाही त्यांनी लगावला. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधून नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. ते म्हणाले, ''उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबतच्या युतीचा केवळ फायदा करून घेतला. हे मैत्रीच्या गप्पा मारतात, पण यांनी मैत्रीत प्रामाणिकपणा ठेवला आहे का. हे युती करतात आणि नंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर टीका करतात, असा टोला नारायण राणे यांनी लगावला. दरम्यान, कणकवली येथे घेतलेल्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर घणाघाती टीका केली होती. ''राणे जिथे जातील त्या पक्षाची वाट लावतील. करून करून भागले आणि देवपूजेला लागले, अशी त्यांची अवस्था झाली आहे. शिवसेनेत होते त्यांना काढलं, काँग्रेसमध्ये होते त्यांना काढलं, आता शेवटचा पर्याय आहे, हा लढा सुसंस्कृत विरुद्ध खुनशी प्रवृती असा आहे. आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते, ते कणकवलीतल्या प्रचारसभेत बोलत होते.  ही पाठीत वार करणारी औलाद आहे. ज्या पक्षाला सोडून गेले, त्या पक्षाला राणेंचे शाप आहेत. माझ्या मित्राकडे हे नको म्हणून भाजपाला सावध करतोय, भाजपात खूनशी वृत्ती नको. विनायक राऊत थांबले, वैभव नाईक उभा राहिला अन् त्यांना गाडले. आता स्वाभिमान शब्दही सर्वात खूश झाला असेल. वाकवली ती मान आणि म्हणे पक्ष स्वाभिमान. मी भाजपाला सावधानतेचा इशारा द्यायला आलो आहे. ही भुतं तुमच्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाहीत. मी टीका करायला आलो नाही, मित्राच्या घरात चोर घुसत असताना शांत कसा बसू?, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राणेंवर टीका केली होती. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नारायण राणे उद्धव ठाकरे