'उद्धव ठाकरे खासगी रुग्णालयात उपचार घेतात, म्हणजे सरकारी हॉस्पीटल चांगले नाहीत'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 04:18 PM2021-11-11T16:18:04+5:302021-11-11T16:19:31+5:30
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर इंधन दरवाढीवरुन टीका केली. केंद्र सरकारने अबकारी कर कमी, त्यानंतर देशातील भाजपाशासित राज्यांनीही राज्यातील कर कमी केला.
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेच्या दुखण्यासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात माहिती दिली. कोरोनाच्या लढाईत राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मानदेखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शारिरीक त्रासाबद्दल माहिती दिली. मात्र, आता चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर इंधन दरवाढीवरुन टीका केली. केंद्र सरकारने अबकारी कर कमी, त्यानंतर देशातील भाजपाशासित राज्यांनीही राज्यातील कर कमी केला. त्यामुळे, पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत. मात्र, महाराष्ट्र सरकारने अद्यापही पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केला नाही. त्यामुळे, आम्ही आज-उद्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवा, असे म्हणणार आहोत, असे पाटील यांनी म्हटले. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत, यावरुनही पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
राज्याचे मुख्यमंत्री कसे काय खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल होतात, याचा अर्थ सरकारी रुग्णालये चांगली नाहीत, हे तुम्ही मान्य करता. देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाला तेव्हा त्यांनी सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात उपचार घेतले. मला खासगी विषयात जायचं नाही, पण ज्याठिकाणी मुख्यमंत्री दाखल असतील, तिथे जाऊन तहसालीदार, कलेक्टर यांनी निवेदन पोहोचवावे. राज्याने 9 टक्के सेस आणि 24 ते 25 टक्के व्हॅट कमी करावा, अशा शब्दात पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रुग्णालयातून लस घेण्याचे आवाहन
कोरोना लसींच्या बाबतीत आपण १० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या एवढीच विनंती करतो असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे.