मुंबई : आपल्या मित्रपक्षाला आणि विशेषता त्यातील काही निवडक नेत्यांना प्रचंड अहंकाराने पछाडले असून, शिवसेनेचा केवळ वापर करून घेण्याचे त्यांचे धोरण आहे, अशा शब्दांत भाजपवर टीका करतानाच शिवसेना-राष्ट्रवादी- काँग्रेस असे सरकार स्थापन करण्याचा मानस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेना आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला.आमदारांना उद्देशून ते म्हणाले की, तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला आहे. मी तुमचा आणि पक्षाचा फायदा होईल, असा निर्णय घेईन. युतीमध्ये शिवसेनेचे नेहमीच नुकसान झाले. फायद्याच्या वेळी भाजपने आपल्याशी चांगले संबंध ठेवले आणि गरज नाही, तेव्हा आपल्याला अपमानित केले. अहंकारी मित्रच आज आपल्याशी शत्रूसारखे वागत आहे. अशा वेळी आपण काय करायचे? त्यांना वठणीवर आणायचे असेल, तर पर्यायाचा विचार करावाच लागेल. कालपर्यंत आम्ही पालखीचे भोई होतो, आता आम्हाला या पालखीत मुख्यमंत्री म्हणून शिवसैनिकालाच बसवायचे आहे, असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला.>बहुमत सिद्ध करूभाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्याने दुसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रित केले आहे. बहुमत सिद्ध करण्याची आपली पूर्ण तयारी झालेली आहे, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र निवडणूक 2019 : सरकार स्थापन करणारच, आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 6:11 AM