Join us

Uddhav Thackeray: "भाजप दाऊदला आणून मंत्री करेल", उद्वव ठाकरेंच्या विधानावर भाजपचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 10:34 PM

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं. तर, ईडी, सीबीआय, आयटी करुन होत असलेल्या टिकांवरुनही भाजपवर निशाणा साधला

मुंबई - भाजप नेत्यांकडून सातत्याने होणारी टिका, राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या भोंग्याचा वाद आणि हिंदुत्त्वाचा मुद्दा. दुसरीकडे राणा दाम्पत्य आणि विरोधकांकडून सातत्याने शिवसेनेवर होणारी टिका, यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केल्याप्रमाणे आज मुंबईतील बीकेसी मैदानात त्यांची जोरदार सभा झाली. या सभेत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी विकासकामांवर भाषण करत राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. त्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर तोफ डागली. भाजपवाले दाऊदला आणून मंत्री करतील, असा टोलाही त्यांनी लगावला. आता, भाजपने मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर पलटवार केला आहे. 

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं. तर, ईडी, सीबीआय, आयटी करुन होत असलेल्या टिकांवरुनही भाजपवर निशाणा साधला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार करताना, दाऊदशी आर्थिक व्यवहार करणारा नेता आपल्या मंत्रिमंडळात आहे, असे म्हटले. तसेच, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा विसर पडला असल्याची टिकाही त्यांनी केली.   

मुख्यमंत्रीपदाच विसर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी मुंबईतील सभेत भाषण करताना राज्याच्या विकासाच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायचे विसरले. स्वतः पेट्रोल डिझेलची महागाई कमी करण्याची जबाबदारी विसरले. दाऊदच्या टोळीशी व्यवहार करणाऱ्याला आपण मंत्रिमंडळात ठेवले आहे, हे सुद्धा विसरले. त्यांना मुख्यमंत्रीपदाचाच विसर पडल्याचे दिसले, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

तरीही तो मंत्री मंत्रिमंडळात कायम 

ते म्हणाले की, भाजपा दाऊदला मंत्री करेल, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी मारला. पण ते हे विसरून गेले की, दाऊद इब्राहिमच्या टोळीला आर्थिक मदत होईल अशा रितीने त्याच्या साथीदारांशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असलेला एक मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. या नेत्याला तुरुंगात जावे लागले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला मंत्रिमंडळात कायम ठेवले आहे. राज्याने व्हॅट कमी करावा

महागाईबद्दल का बोलत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केला. राज्यातील पेट्रोल डिझेलवरील कर कमी करा म्हणून पंतप्रधानांनी सांगितल्याचाही त्यांना राग आला. पण, उद्धव ठाकरे विसरले की, पेट्रोल डिझेलवरील व्हॅटच्या दरात कपात करुन त्यांचे सरकार महाराष्ट्रातील जनतेला महागाईपासून मोठा दिलासा देऊ शकते. असा दिलासा गुजरात आणि इतर राज्यांनी दिला आहे. स्वतः महागाई कमी करण्यासाठीची जबाबदारी विसरून दुसऱ्याला सवाल विचारणे म्हणजे मुख्यमंत्री असल्याचा विसर पडल्याचे लक्षण आहे.

राज्यातील मूळ प्रश्नांवर ते बोललेच नाहीत

ते म्हणाले की, आपल्या सरकारमुळे मराठा समाजाचे असलेले आरक्षण गेले व ते पुन्हा मिळविण्यासाठी सरकार काहीच करत नाही, ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले, राज्यात पुन्हा लोडशेडिंग सुरू झाले, शेतकऱ्यांची वीज कनेक्शन मोठ्या प्रमाणात कापली, हजारो एकरांवर अजूनही ऊस तसाच उभा आहे आणि ऊसाचे गाळप होत नाही म्हणून शेतकऱ्याने आत्महत्या केली. अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल त्यांनी उल्लेखही केला नाही. विकासकामे म्हणून मुंबई महापालिकेने केलेले शाळांचे काम सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आपण मुख्यमंत्री असल्याचा विसर पडलेला दिसला. 

टॅग्स :उद्धव ठाकरेचंद्रकांत पाटीलशिवसेनाभाजपा