पाकिस्तान व दाऊदची जपमाळ ओढायची हा भाजपाचा 'नापाक'पणाच - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 07:51 AM2017-12-12T07:51:12+5:302017-12-12T07:53:53+5:30

पाकच्या हस्तक्षेपावर प्रचारसभांतून का बोलता? असा हस्तक्षेप सुरू असेल तर पाकड्यांच्या हद्दीत सैन्य घुसवून आपला हस्तक्षेप सुरू करा.

Uddhav Thackeray, BJP's 'nefarious' attitude towards Pakistan and Dawood's rosary | पाकिस्तान व दाऊदची जपमाळ ओढायची हा भाजपाचा 'नापाक'पणाच - उद्धव ठाकरे

पाकिस्तान व दाऊदची जपमाळ ओढायची हा भाजपाचा 'नापाक'पणाच - उद्धव ठाकरे

googlenewsNext
ठळक मुद्देप्रचार सभांतून आरोपांचा धुरळा न उडवता पंतप्रधानांनी या वळवळणाऱ्या जिभा व हात कलम करण्याची हिंमत दाखवायला हवी असे लेखात म्हटले आहे.  राज्यसभा निवडणुकीत अहमद पटेल यांचा पराभव करण्यासाठी भाजप सरकारने शर्थ केली होती.

मुंबई - पाकच्या हस्तक्षेपावर प्रचारसभांतून का बोलता? असा हस्तक्षेप सुरू असेल तर पाकड्यांच्या हद्दीत सैन्य घुसवून आपला हस्तक्षेप सुरू करा. मोदी यांच्याकडून देशाला कृतीची अपेक्षा आहे, कृती करा. पाकड्यांची जपमाळ किती ओढाल ? असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे. 

आता गुजरातच्या विधानसभा निवडणुकीतही पाकड्यांचा हात व जीभ वळवळत असेल तर फक्त प्रचार सभांतून आरोपांचा धुरळा न उडवता पंतप्रधानांनी या वळवळणाऱ्या जिभा व हात कलम करण्याची हिंमत दाखवायला हवी असे लेखात म्हटले आहे.  राज्यसभा निवडणुकीत अहमद पटेल यांचा पराभव करण्यासाठी भाजप सरकारने शर्थ केली होती. तोच शर्थीचा डाव त्यांनी पाकविरोधात लावला तर पाकड्यांचा हिंदुस्थानविरुद्ध एकही डाव यशस्वी होणार नाही असा टोला मोदींना लगावला आहे.  

प्रत्येक निवडणुकीत सध्या एक तर पाकिस्तान आणले जाते नाहीतर दाऊद इब्राहिमचा तडका मारला जातो. ही वैचारिक दिवाळखोरी आहे. पायाखालची वाळू सरकली की पाकिस्तान व दाऊदची जपमाळ ओढायची असाच प्रकार सध्या सुरू आहे. हा एकप्रकारे ‘नापाक’पणाच आहे असे लेखात म्हटले आहे. 

काय म्हटले आहे अग्रलेखात 
- गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत पाकड्यांचा हात व जीभ वळवळत असेल तर फक्त प्रचार सभांतून आरोपांचा धुरळा न उडवता पंतप्रधानांनी या वळवळणाऱ्या जिभा व हात कलम करण्याची हिंमत दाखवायला हवी. पुन्हा पाकच्या हस्तक्षेपावर प्रचारसभांतून का बोलता? असा हस्तक्षेप सुरू असेल तर पाकड्यांच्या हद्दीत सैन्य घुसवून आपला हस्तक्षेप सुरू करा. मोदी यांच्याकडून देशाला कृतीची अपेक्षा आहे, कृती करा. पाकड्यांची जपमाळ किती ओढाल?

- गुजरात विधानसभा निवडणुकीत पाकिस्तानचा हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. मोदी यांची चिंता समजण्यासारखी आहे, पण पंतप्रधानांनी आरोप करायचे नसतात, कृती करायची असते. गुजरात निवडणुका या कश्मीर प्रश्नापेक्षा महत्त्वाच्या ठरत आहेत. कालपर्यंत कश्मीरात पाकिस्तानचा हस्तक्षेप होता. लेह, लडाख, अरुणाचलमध्ये चीनचा हस्तक्षेप होता. तो कमी होण्याऐवजी अलीकडे जास्तच वाढला आहे. कधी नव्हे ते सिक्कीमच्या सीमा पार करून चिन्यांचे सैन्य डोकलामपर्यंत घुसले होते. पण गुजरातच्या निवडणुकीतही पाकचा हस्तक्षेप वगैरे अचानक वाढला असेल तर मोदी यांच्या चिंतेची आम्हालाही काळजी वाटत आहे. पालनपूर येथील एका सभेत मोदी यांनी अशी ठिणगी टाकली की, पाकिस्तानी सैन्याचे माजी महासंचालक सरदार अर्शद रफीक यांनी अहमद पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्री होण्याचे आवाहन केले आहे. याचा अर्थ काय? असा खडा सवाल मोदी यांनी विचारला आहे व तो शतप्रतिशत योग्य आहे. हिंदुस्थानच्या एखाद्या राज्यात कोणी मुख्यमंत्री व्हायचे व कोणी नाही हा चोंबडेपणा करण्याचा अधिकार पाकड्यांना कोणी दिला? पाकड्यांनी आज अहमद पटेलांचे नाव घेतले. त्यांनी काशीनाथ रुपाला किंवा भरतसिंह सोलंकी यांचे नाव घेतले असते तरीही ते योग्य नाही. अर्थात अहमद पटेल यांच्या नावाचा उद्धार करून गुजरात निवडणुकीत कुणी हिंदू-मुसलमान मतांची फाळणी करून निवडणुका जिंकू पाहत आहेत का, हादेखील प्रश्न उद्या उपस्थित होऊ शकतो.

- एखाद्या देशाच्या काही आवडी निवडी असतात व हिंदुस्थानचे पंतप्रधान वाजपेयी हे भले माणूस असून त्यांनीच पंतप्रधानपदी राहावे अशी भूमिका तेव्हा पाकड्यांच्या गोटात होतीच. आता गुजरातच्या विधानसभा निवडणुकीतही पाकड्यांचा हात व जीभ वळवळत असेल तर फक्त प्रचार सभांतून आरोपांचा धुरळा न उडवता पंतप्रधानांनी या वळवळणाऱ्या जिभा व हात कलम करण्याची हिंमत दाखवायला हवी. राज्यसभा निवडणुकीत अहमद पटेल यांचा पराभव करण्यासाठी भाजप सरकारने शर्थ केली होती. तोच शर्थीचा डाव त्यांनी पाकविरोधात लावला तर पाकड्यांचा हिंदुस्थानविरुद्ध एकही डाव यशस्वी होणार नाही. प्रत्येक निवडणुकीत सध्या एक तर पाकिस्तान आणले जाते नाहीतर दाऊद इब्राहिमचा तडका मारला जातो. ही वैचारिक दिवाळखोरी आहे. पाकिस्तानने तर आता आव्हानच दिले. तुमच्या निवडणुकीत आम्हाला का ओढता? तुमच्या बळावर निवडणुका लढा, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैरूल यांनी म्हटले आहे.

- पण पायाखालची वाळू सरकली की पाकिस्तान व दाऊदची जपमाळ ओढायची असाच प्रकार सध्या सुरू आहे. हा एकप्रकारे ‘नापाक’पणाच आहे. मागे बिहार निवडणुकीच्या प्रचारातही भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी पाकिस्तानला घुसवलेच होते. बिहारात नितीशकुमारांचा विजय झाला तर पाकिस्तानात फटाकेच फटाके फुटतील, अशी भविष्यवाणी श्री. शहा यांनी करूनही तेथे भाजपचा दारुण पराभव व नितीशकुमारांचा विजय झाला. त्याच नितीशकुमारांबरोबर आता भाजप सत्तेत सहभागी झाला. त्यामुळे पाकिस्तानात फटके फुटले की भूकंप झाला हे कळायला मार्ग नाही, पण गुजरात निवडणुकीत पाकिस्तानछाप भिजलेल्या फटाक्यांचा धूर मात्र निघत आहे. 

- मोदी यांनी असाही आरोप केला आहे की, मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीबाबत मीडियात वृत्त होते. या बैठकीत पाकचे उच्चायुक्त, पाकचे माजी विदेशमंत्री, हिंदुस्थानचे माजी उपराष्ट्रपती, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग उपस्थित होते. मोदी म्हणतात, तीन तास ही बैठक चालली. जर ही बैठक देशविरोधी कृत्यांसाठी वगैरे झाली असेल तर पंतप्रधान नुसते ‘आरोप’ का करीत आहेत. राष्ट्रीय सुरक्षेसाठी बैठकीतील एकजात सगळय़ांना ‘अटक’ करा व चौकशी करा. गुजरातच्या पालनपूर प्रचारसभेचे व्यासपीठ ही भाषणाची जागा आहे, कारवाईची नाही. डॉ. मनमोहन सिंग यांच्या राष्ट्रभक्तीविषयी मोदी यांच्या मनात शंका निर्माण झाली असेल तर त्यांनी बेशकपणे तसे बोलायला हवे. मनमोहन हे ‘मौनीबाबा’ आहेत असा आरोप मोदी व त्यांचे भक्त करीत होते. या मौनीबाबांनी मोदी किंवा देशविरोधी कारवायांत भाग घेतला व त्यानंतर गुजरात निवडणुकीत पाकचा हस्तक्षेप सुरू झाला, असे मोदी यांना वाटते. मोदी यांनी आरोप केले, पण सरकारकडे प्रचंड ताकदीची गुप्तचर यंत्रणा असते. तरीही पाकसोबतच्या बैठकीचे वृत्त पंतप्रधानांना मीडियातून कळले. तेव्हा हीसुद्धा बाब तितकीच गंभीर आहे. पुन्हा पाकच्या हस्तक्षेपावर प्रचारसभांतून का बोलता? असा हस्तक्षेप सुरू असेल तर पाकड्यांच्या हद्दीत सैन्य घुसवून आपला हस्तक्षेप सुरू करा. मोदी यांच्याकडून देशाला कृतीची अपेक्षा आहे, कृती करा. पाकड्यांची जपमाळ किती ओढाल? आरोपांच्या फैरी काय, यशवंत सिन्हा व नाना पटोलेसुद्धा झाडतात.

Web Title: Uddhav Thackeray, BJP's 'nefarious' attitude towards Pakistan and Dawood's rosary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.