उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येऊच शकत नाहीत, कारण...; देवेंद्र फडणवीस थेटच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 09:27 PM2024-02-15T21:27:30+5:302024-02-15T21:28:20+5:30
उद्धव ठाकरे आणि आमची पुन्हा युती होण्याची शक्यता नसल्याचं मत फडणवीसांनी व्यक्त केलं आहे.
Devendra Fadnavis Lokmat Interview ( Marathi News ) : मुंबईतील ऐतिहासिक 'गेट वे ऑफ इंडिया' इथं 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'चा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्यानंतर या सोहळ्यात लोकमत समूहाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा आणि मुंबई लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. अवघड प्रश्नांची गुगली आणि त्यावर देवेंद्र फडणवीसांनी लगावलेल्या षटकारांनी ही मुलाखत रंगली. याच मुलाखतीत फडणवीस यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीबाबतही प्रश्न विचारण्यात आला. मात्र उद्धव ठाकरे आणि आमची पुन्हा युती होण्याची शक्यता नसल्याचं मत फडणवीसांनी व्यक्त केलं आहे.
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी तुमची मैत्री घट्ट झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्याशीही आपली जुनी मैत्री आहे. ते पुन्हा तुमच्यासोबत येतील का?" असा प्रश्न डॉ. विजय दर्डा यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, "उद्धवजी आमच्यासोबत येण्याची कोणतीही शक्यता नाही. कारण उद्धवजींनी आमच्याकरता आपली दारं बंद केली. एखाद्या गोष्टीवर तुमचे मतभेद असतील तर ते मतभेद दूर करून एकत्र येता येतं. पण इथं मात्र परिस्थिती वेगळी आहे. इथे आमची मनं दुखावली आहेत," अशा शब्दांत फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
"मतभेद नव्हे मनभेद झाले"
उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजपवर होत असलेल्या आक्रमक टीकेबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, "ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंचा व्यवहार राहिला आहे, ज्या प्रकारे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात, ज्या खालच्या स्तरावर जाऊन ते बोलतात, त्यामुळे मनं दुखावतात. जिथे मनं दुखावतात तिथं युती होत नाही. राजकीय मतभेद असतील तर ते दूर करून एकत्र येता येतं. पण जिथं मनं दुखावली असतील तिथं एकत्र येणं कठीण असतं आणि आमचं मनं दुखावली आहेत, हे मात्र नक्की आहे."
दरम्यान, एनडीएतील जुने सहकारी असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाने नुकतीच विरोधकांच्या इंडिया आघाडीची साथ सोडत पुन्हा एनडीएत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आज 'लोकमत'च्या मुलाखतीत स्पष्टपणे भाष्य करत ही शक्यता फेटाळून लावली आहे.