Uddhav Thackeray: 'मुख्यमंत्र्यांची केवळ टोमणेबाजी, स्वत:ला झोकून देऊन काम केलं नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 08:59 AM2022-06-12T08:59:48+5:302022-06-12T09:27:20+5:30
सर्व अपक्ष आमदारांचे मी मनापासून आभार मानते, हा सत्याचा विजय आहे. कारण, सत्याच्या बाजुने सर्वजण आहेत, याचा मला आनंद आहे.
मुंबई - देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या स्मार्ट राजकीय खेळीचे सर्वत्र कौतुक केले जात असताना, पत्नी अमृता फडणवीस यांनीही त्यांचे कौतुक केले आहे. तसेच, अब देवेंद्र अकेला नहीं, ना कभी था. सारी कायनात उनके साथ है, असे अमृता यांनी म्हटले. अमृता यांनी भाजपच्या विजयाबद्दल पती देवेंद्र यांच्यासह सर्व नेत्यांचे आणि पक्षातील कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तर, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही टिका केली.
सर्व अपक्ष आमदारांचे मी मनापासून आभार मानते, हा सत्याचा विजय आहे. कारण, सत्याच्या बाजुने सर्वजण आहेत, याचा मला आनंद आहे. मला नक्कीच आनंद आहे की, देवेंद्र अकेला नही है और न कभी था. त्यांच्यासोबत संपूर्ण ताकद आहे. आम्ही सर्वजण आहोत, तुम्हीही आहात. आता, प्रगतीचं राजकारणच जगात पुढे येईल, टोमणेबाजीचं नाही, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी नाव न घेता मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. मुख्यमंत्र्यांनी स्वत:ला झोकून देऊन काम केलं नाही, त्यांनी केवळ टोमणेबाजीचं राजकारण केलंय, अशी टिकाही त्यांनी केली. तसेच, शिवसेनेला हा धडा नसून आता धडा चालू होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.
विधानपरिषदेचा निकाल ऑलरेडी बाहेर
भाजपा रडीचा डाव खेळत नाही, ती स्वकर्तृत्वावर सर्वकाही मिळवत आहे. राज्यात रडीचा डाव खेळण्यासाठी महाविकास आघाडी आहे, भाजपची गरज नाही, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिलं. तसेच, राज्यसभा आपलीच झालीय, विधापरिषदेतही दुमत नाही. कारण, विधानपरिषदेचा निकाल ऑलरेडी बाहेरच आहे, असेही त्यांनी म्हटलं.
पवारांकडूनही फडणवीसांचे कौतुक
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले. भाजपने अपक्षांची जी मोट बांधण्याचा प्रयत्न केला, त्यात ते यशस्वी झाले आणि त्याचाच फरक पडला. चमत्कार झाला हे मान्य केले पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी विविध मार्गाने माणसे आपलीशी करण्याच्या गोष्टीमुळे त्यांना यश आले आहे. राज्यसभा निवडणुकाचा निकाल हा धक्का बसणारा नाही. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी जो मतांचा कोटा ठरवला होता त्याची संख्या पाहिली तर तिन्ही पक्षांच्या कोटामध्ये फरक पडलेला नाही, असेही पवार यांनी म्हटलं.