Uddhav Thackeray News: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची यंदापासून अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यानुसार पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्यात येणार आहे. हिंदी भाषा अनिवार्य करण्याला काही राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य करण्याला राज्यातील सात शिक्षक संघटनांनी याला विरोध केला आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत असून, उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या सक्तीवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी अनेकविध विषयांवर भाष्य करताना भाजपा, केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. वक्फ बोर्ड विधेयकात गैर मुस्लीम व्यक्ती वक्फ बोर्डावर नियुक्ती करण्याची तरतूद होती. त्या तरतुदीला आमचा विरोध होता. आम्ही जो प्रश्न विचारला तोच प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला. गैर मुस्लीम लोक वक्फ बोर्डावर घेतले जातील, मग उद्या मंदिरांमध्ये गैर हिंदूंच्या नियुक्ती करणार नाही, याची काय खात्री आहे, अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली.
इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही
आंधळेपणे आम्ही पाठिंबा देणार नाही. हिंदी बोलले म्हणजे हिंदू नाही. आम्ही मराठी बोलणारे कट्टर तुमच्यापेक्षा जास्त देशाभिमानी हिंदू आहोत, असे सांगत राज्य शासनाच्या हिंदी सक्तीच्या निर्णयास विरोध करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन आणि मी पुन्हा मतदान करीन. आम्ही प्रेमाने सगळे ऐकून घेऊ. पण सक्ती कराल तर तुमच्यासह उखडून टाकू. हिंदीची सक्ती कशासाठी? मला अभिमान आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा सक्ती करण्याचा निर्णय मी मुख्यमंत्री असताना केला आहे. येथे अमराठी पिढ्यान पिढ्या राहत आहेत. आम्ही सुरू केलेल्या मराठी शिकण्याचा वर्गावर ते येत आहेत. हिंदीची सक्ती आम्ही होऊ देणार नाही. इथले मीठ खाता आणि मराठीला विरोध करता? आपले सरकार असताना असे धाडस करण्याची कोणाची हिंमत नव्हती, असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांना सांगतो, तुमचे जे कोणी आले होते ना जोशी की माशी... ते घाटकोपरमध्ये बोलले होते, आता त्या घाटकोपरमध्ये मराठी सक्ती करून दाखवा. घाटकोपरमध्ये प्रत्येक माणूस मराठी बोलला पाहिजे असे करून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.