आज दसरा मेळाव्यामधून शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली. एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला मजबूत सरकारची आवश्यता असल्याचे बोलून दाखवले होते. मात्र गेल्या ९ वर्षांपासून पाशवी बहुमत असलेल्या सरकारचा आपण अनुभव घेतलाय. आता असं एकपक्षीय बहुमत असलेलं सरकार नको. कारण खुर्ची डळमळीत असते तेव्हा देश मजबूत होतो, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी याच मंचावरून या देशाला मजबूत सरकारची गरज आहे म्हणून सांगितलं होतं. पण असं मजबूत सरकार आम्ही गेल्या ९ वर्षांपासून पाहतोय. २०१४ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटायला मोदींसोबत आम्हीही गेलो होतो. तेव्हा मुखर्जी यांनी २५-३० वर्षांनंतर बहुमताचं सरकार आलं म्हणून आनंद व्यक्त केला होता. देशात स्थैर्य येईल, असं म्हटलं होतं. पण आता मी विचारतो की, आता आलंय का स्थैर्य. तुमचे प्रश्न सुटलेत काय?
उद्धव ठाकरे म्हणाले की, आता सरकार तर बदललं पाहिजेच. पण जे सरकार येईल ते मजबूत असलं तरी एका पक्षाचं बहुमत असलेलं पाशवी बहुमत असलेलं सरकार नको. अजिबात नको. जेव्हा खुर्ची थोडी डळमळीत असते तेव्हा देश मजबूत होतो. नरसिंह राव यांनी चांगलं काम केलं. मनमोहन सिंग यांनी चांगलं काम केलं. वाजपेयींनी चांगलं काम केलं. सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं सरकार पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.