Join us  

ओबीसींचं आरक्षण कायम ठेवून मराठा आरक्षणासाठी संसदेत विधेयक आणा; उद्धव ठाकरेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 2:01 PM

तुम्ही मराठा आरक्षणासाठी विधेयक आणा, आम्ही पाठिंबा देऊ, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना केलं आहे. 

Uddhav Thackeray Speech ( Marathi News ) : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून धुमसत असलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे सर्वच राजकीय पक्षांची कोंडी झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सभा घेण्यासाठी गेल्यानंतर राजकीय नेत्यांना घेराव घालत आंदोलकांकडून मराठा आरक्षणाबाबतची भूमिका जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर केली असून संसदेत तुम्ही मराठा आरक्षणासाठी विधेयक आणा, आम्ही पाठिंबा देऊ, असं आवाहन त्यांनी सत्ताधाऱ्यांना केलं आहे. 

मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्रात तुम्ही मराठा, ओबीसी, धनगर अशी समाजासमाजात आग लावली आहे. माझी तर स्पष्ट भूमिका आहे आणि शरद पवारांसह काँग्रेसनेही याबाबत स्पष्टपणे सांगितलं आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्य सरकारला नसून केंद्र सरकारला आहे. काही दिवसांपूर्वी बिहारने वाढवलेली आरक्षणाची मर्यादा सुप्रीम कोर्टाने उडवून लावली आहे. हा अधिकार फक्त आणि फक्त लोकसभेला आहे. अन्यथा राष्ट्रपती हे करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल घेऊन आणि त्यांचा सल्ला घेऊन हे केलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही संसदेत मराठा आरक्षणासाठी एकूण आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचं विधेयक संसदेत आणा, ओबीसी बांधवांचं आरक्षण कायम ठेवा, धनगर समाजालाही आरक्षण द्या, आम्ही महाराविकास आघाडी म्हणून या विधेयकाला पाठिंबा देऊ," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, "सत्ताधाऱ्यांकडून हिंदू-मुस्लिमांमध्ये, मराठी-मराठेत्तरांमध्ये आणि जाती-जातींमध्ये आगी लावण्याचं काम सुरू आहे. या आगींवर स्वत:च्या पोळ्या भाजण्याचं त्यांचं काम सुरू आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही," असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेमराठा आरक्षणमनोज जरांगे-पाटीलमहाविकास आघाडी